(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) जिल्ह्यात अधिकाधिक दर्जेदार खेळाडू तयार व्हावेत, याकरीता जिल्हा क्रीडा संकुलात खेळाडूंना माफक दरात चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक काल (ता १७) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी ते बोलत होते.
बैठकीस आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित, श्री. शिव छत्रपती पुरस्कार विजेते डॉ प्रदिप तळवेलकर, नगरसेवक नितिन बर्डे, श्याम कोगटा आदि उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पालकमंत्री श्री पाटील म्हणाले की, शासनाच्या नवीन निर्देशानुसार जिल्हा व तालुका क्रीडा संकुल उभारणीचा मसुदा नव्याने तयार करण्यात यावा. जिल्ह्यातील 11 तालुक्यांच्या अपूर्ण क्रीडा संकुल बांधकामासाठी वाढीव निधी मागणीचा प्रस्तावही तयार करण्यात याव्यात. जिल्हा क्रीडा संकुलात विविध खेळांच्या सरावासाठी येणाऱ्या खेळाडूंना चांगल्या दर्जाच्या सुविधांबरोबरच चांगले मार्गदर्शक (कोच) उपलब्ध करुन द्यावेत. तसेच खेळाच्या सुविधा वापराचे दर माफक असावे अशी सुचनाही केली. जळगाव जिल्हा कुस्तीसाठी प्रसिध्द आहेत. जिल्ह्यात महाराष्ट्र केसरीसारखे खेळाडू आहेत. जिल्ह्यात अजून चांगले कुस्तीगीर निर्माण होण्यासाठी कुस्तीसाठी कोच मिळण्यासाठी क्रीडा आयुक्तांकडे मागणीचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिलेत. ग्रामीण भागातही चांगले खेळाडू तयार व्हावेत याकरीता निधीच्या उपलब्धतेनुसार खुल्या व्यायामशाळांना मंजूरी द्यावी. जिल्ह्यातील तालुका क्रीडा संकुलांचे अपूर्ण कामे पूर्ण होण्यासाठी क्रीडामंत्र्यांशी चर्चा करणार असून जिल्हयात क्रीडा सुविधा उपलब्ध होण्यासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सोबतच जिल्हा क्रीडा संकुलातील जुन्या गाळयांबाबत निर्णय घेण्यासाठी पाच जणांची उपसमिती नेमण्यात यावी असेही निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिलेत. त्याचबरोबर जे गाळेधारक अनेक वर्षांपासून थकबाकीदार आहेत. त्यांचे गाळे बंद आहेत त्यांना रितसर नोटीस देऊन त्यांचे गाळे जप्तीबाबत पुढील कायदेशीर कारवाई करण्याची सुचनाही त्यांनी बैठकीत दिलीत. बैठकीच्या सुरुवातीस पालकमंत्र्यांनी जिल्हा क्रीडा संकुलास भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर बैठकीत जिल्ह्यातील क्रीडा संकुलांच्या बांधकामाचा, तेथील साहित्य, खेळाडूच्या सोईसुविधांचा आढावा घेतला. यावेळी क्रीडा संकुलातील कर्मचाऱ्यांचे मानधन, संकुलातील गाळ्यामधील भागीदारीचे नांव रेकॉर्डवरुन कमी करणे, गाळे हस्तांतरण मान्यता, संकुलातील दुरुस्ती व सुविधा, महापालिकेच्या थकीत पाणीपट्टी व मालमत्ता कर आदि विविध विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.