धुळे राजमुद्रादर्पण । धुळे जिल्हा परिषदेच्या १५ जागांसाठी तर पंचायत समितीच्या ३० जागांसाठी पोटनिवडणूक झाली. धुळ्यामध्ये थेट महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना बघायला मिळाला. या निवडणुकीमध्ये भाजपने सत्ता मिळवत महाविकास आघाडीला धोबीपछाड केले आहे.
जिल्हा परिषद गटामध्ये लामकनी गट चर्चेत ठरला. लामकनी गटाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. कारण गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांची कन्या लामकनी येथून भाजपतर्फे उमेदवारी करत असल्यामुळे ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची होती. धरती देवरे यांनी या निवडणुकीमध्ये जवळपास चार हजारांहून अधिकच्या फरकाने निवडणूक जिंकली आहे.
भाजपने बहुमत राखण्यात यश मिळवले असले तरी यापूर्वी जिंकलेल्या चार जागा भाजपला गमवावे लागले आहेत. तर दुसरीकडे या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र तीन जागांचा फायदा झाला आहे. तर शिवसेना आहे त्याच जागांवर थांबल्याचे बघायला मिळत आहे. काँग्रेसला देखील या निवडणुकीमध्ये एका जागेचा फायदा झाल्याचे दिसत आहे. एकूणच काय धुळे जिल्हा परिषदेवर भाजपचा पुन्हा झेंडा फडकला असला तरी भाजपला या पोटनिवडणुकीत दरम्यान तीन पक्ष एकत्र आल्यामुळे चार जागांचा फटका बसला आहे. तर दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जागांचा फायदा झाला आहे. तर काँग्रेसला एक जागेचा फायदा झाल्याचे दिसून येत आहे.
पंचायत समितीबाबत विचार केल्यास भाजपला १५ जागा मिळाल्या आहेत. तर सेना व राष्ट्रवादीला प्रत्येकी तीन जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला चार जागा मिळाल्याने ग्रामीण भागात काँग्रेसचे वर्चस्व पुन्हा एकदा दिसून आले आहे. तर दुसरीकडे शिरपूरमध्ये भाजपने सहा जागांवर विजय मिळवत भाजपचे अमरिशभाई पटेल यांनी आपला गड राखण्याचे दिसून येत आहे. त्यासोबतच शिंदखेडा येथेदेखील भाजपने चार जागांपैकी तीन जागा काबीज करत भाजपचे माजी मंत्री जयकुमार रावल यांनी आपले वर्चस्व कायम ठेवल्याचे दिसून येत आहे.