शिरपूर राजमुद्रादर्पण । विजयाचा गुलाल अंगावरून पुरता निघालाही नव्हता तोच पोलिसांच्या कारवाईला सामोरे जाण्याची वेळ पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्यावर आली. मतमोजणीनंतर झालेल्या हाणामारी प्रकरणात त्यांच्यासह दहा जणांविरोधात शिरपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
शिरपूर पंचायत समितीच्या सहा गणांसाठी सहा ऑक्टोबरला मतमोजणी झाली. त्यात शिंगावे गणातून भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांत दामोदर पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रमाकांत पाटील यांचा पराभव केला. कोरोना साथप्रतिबंधक अधिनियम व महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये पोलिसांनी विजयी उमेदवारांना मिरवणूक काढण्यास मनाई केली होती. मात्र भाजप समर्थकांनी चंद्रकांत पाटील यांची मिरवणूक काढली. शिरपूर-शहादा रस्त्यावर पित्रेश्वर रिक्षा स्टॉपजवळ सकाळी अकराला मिरवणूक पोहचल्यावर प्रतिस्पर्धी गटातील काहींशी एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरून वाद पेटला.
त्याचे पर्यवसान दंगलीत झाले. काठ्या, दगड-विटांचा वापर झाल्याने शिंगावे ग्रामपंचायतीचे उपसरपंच चंद्रकांत लोटन पाटील, विठ्ठल पाटील, दीपक पाटील, गणेश पाटील, दिनेश पाटील व पंकज पाटील (सर्व रा.शिंगावे) जखमी झाले. पोलिसांतर्फे हवालदार हेमंत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचायत समिती सदस्य चंद्रकांत पाटील, उपसरपंच चंद्रकांत तथा भुरा पाटील, विठ्ठल पाटील, अमोल पाटील, सागर पाटील, भाऊसाहेब पाटील, दिनेश पाटील, दीपक पाटील, गणेश पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.