ठाणे राजमुद्रादर्पण । राजकारणात नवी कीड लागली आहे. लांबलांब जीभा काढून बडबड करण्याची काही लोकांना सवय लागली आहे. त्यांच्या असे महारक्तदान शिबीर घेण्याची हिंमत आहे का?; असा सवाल मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी केला आहे.ठाण्यात महारक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. सात दिवस हे शिबीर सुरू राहणार आहे. या शिबीराला मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा सवाल केला. हल्ली राजकारणात कीड लागली आहे. लांबलांब जीभा काढून बडबड केली जात आहे. असं रक्तदान शिबीर घेण्याची त्यांच्यात हिंमत आहे का? तुम्ही आवाहन केलं तर रक्तदानासाठी अशी गर्दी उसळेल का? आम्ही बघत नाही हे रक्त कुणाला जातं. ज्याला आवश्यक आहे त्याला रक्त जात आहे. जीवदान देणारे हे कार्यक्रम कुठे दिसत नाही. कर्तव्य म्हणून शिवसैनिक मोठं काम करत आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
दिघे साहेबांसोबत मी जगदंबेच्या दर्शनाला येत होतो. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि इतरांनी ही परंपरा सुरू ठेवली. एक दोन वर्ष मी दर्शनाला आलो नाही. त्यात खंड पडला. पण ती उणीव भरून काढेन. मी आई जगदंबेच्या आणि ठाणेकरांच्या दर्शनाला येणार आहे. ही आपली परंपरा आहे. हिंदुत्वाची परंपरा आहे. हिंदुत्वाची परंपरा राखत असताना आपण नवरात्रीत दुर्गामातेची पूजा करतो. आपण ज्या मातेची पूजा करतो ती एक मोठी शक्ती आहे. महिषासूर, नरकासूरासह जेवढे जेवढे असूर आले त्यांचा या जगदंबने, आदिमायेने त्या त्या युगात संहार केला. तिच्या हातात शस्त्र आहे. आमचं हिंदुत्व असं आहे. अन्याय होतो तो चिरडून टाकणं आणि गोरगरीबांचं रक्षण करणं हेच आमचं हिंदुत्व आहे. हे रक्षण करताना नाक्या नाक्यावर तलवारी घेऊन उभं राहण्याची गरज नाही. तुम्ही लोकांचा जीव वाचवत आहात हे पवित्रं काम आहे. तुम्ही रक्त न सांडता रक्तदान करून लोकांचे जीव वाचवत आहात. तेच काम कायम ठेवा, असं ते म्हणाले.