जळगाव राजमुद्रादर्पण । कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यात ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत ‘मिशन कवच कुंडल’ अंतर्गत कोविड- 19 विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संवाद साधला. या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा परिषदेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. पांढरे, तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी ऑनलाइन सहभागी झाले होते.
जिल्ह्यात लसीचे अडीच लाख डोस आलेले आहेत. आगामी काळात आणखी ४ लाख डोस उपलब्ध होणार आहेत. या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहिमेस वेग देण्याचे नियोजन आहे. आरोग्य यंत्रणेने लोकप्रतिनिधींसह तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, स्वयंसेवी, सामाजिक संस्थांची मदत घ्यावी. त्याचबरोबर रेल्वे स्टेशन, बस स्टॅण्ड, धार्मिक स्थळे, मंदिरे आदी ठिकाणी लसीकरणासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करावे.
जिल्ह्यात आतापर्यंत १८ लाख ४७ हजार नागरिकांनी पहिला डोस तर ६ लाख ६ हजार नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला आहे. अद्याप ज्या नागरीकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेला नसेल त्यांनी तातडीने पहिला डोस घ्यावा. तसेच ज्या नागरिकांना पहिला डोस घेऊन पुरेसा कालावधी झाला असेल त्यांनी दुसरा डोस घ्यावा. विविध सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांनीही लसीकरण मोहिमेत आरोग्य विभागाला मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.