जळगाव राजमुद्रा दर्पण। येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिर येथे स्थापित विश्वातील एकमेव श्री भूमिमातेच्या मूर्तीची नऊ दिवसात नऊ अलौकिक रूपांच्या दर्शनाचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध करण्यात आल्याची माहिती श्री मंगळग्रह मंदिर देवस्थानच्या विश्वस्थ यांनी दिली आहे. भाविकांना नवरात्र उत्सवाच्या पवित्र दिवसात श्री भूमातेचे दर्शन व्हावे यासाठी विविध कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
जगप्रसिद्ध मंगळदेव ग्रह मंदिरात दर वर्षीच्या नवरात्रात दुर्गा देवीच्या विविध स्वरुपांचे स्मरण, पूजन, जप, आराधना, उपासना केली जाते. दुर्गा देवीचे आणि तिच्या स्वरुपांचे पूजन करणे शुभ लाभदायक तसेच पुण्यफलदायक आहेच मनोभावे भक्ती केली तर निश्चित फळ मिळतेच अशी मान्यता आहे. नवरात्रोत्सव म्हणजे साक्षात शक्तिदेवतेचा उत्सव. शक्तीची उपासना मानवाला नेहमीच प्रेरणादायी ठरते. याच साठी अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा कालावधी म्हणजेच नवरात्र विशेष मास ठरतो.
दुर्गा देवीचे स्कंदमाता स्वरुप प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक मानले जाते. स्कंदमाता कुमार कार्तिकेयाची माता असल्याची मान्यता आहे. स्कंदपुराण व अन्य सुक्तात वर्णील्या प्रमाणे कुमार कार्तिकेयांना स्कंद असेही संबोधले जाते. म्हणूनच देवीच्या या स्वरुपाला स्कंदमाता म्हटले जाते. कुमार कार्तिकेयाने देवासुर संग्रामात देवतांच्या सेनापतीची धुरा सांभाळली होती अशी माहिती धार्मिक ग्रंथात वर्णिली आहे. स्कंदमाता चतुर्भुज असून कुमार कार्तिकेय मातेसोबत आहेत. आवडते कमळाचे फूल देवीच्या हातात आहे. देवीचे वाहन सिंह आहे. अशी ही स्कंदमाता सौरमंडळाची अधिष्ठात्री असल्याने तिची आराधना संबंध प्राणीमात्रास उपकारक आहे.
घरात सुख, शांतता, समृद्धी नांदते, अशी मान्यता असून देवीचे पूजन करताना सौभाग्यलंकार अर्पण करावे, देवीला प्रिय असलेले लाल व पिवळ्या रंगाचे फूल व अक्षता वाहावे. तसेच देवीला केळ्याचा समावेश असलेला नैवेद्य अर्पण केला पाहिजे. लाल व पिवळा रंग प्रिय असल्यामुळे नैवेद्यात आणि पूजन करताना पिवळ्या रंगाचा समावेश असलेल्या गोष्टींचा आवर्जुन वापर करावा जेणे करून देवी प्रसन्न होईल.
स्कंदमाता देवीचा मंत्र
सिंहासना गता नित्यं पद्माश्रि तकरद्वया ।
शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी।।
या देवी सर्वभूतेषु मां स्कंदमाता रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।
असेच विलोभनीय दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी जगप्रसिद्ध मंगळदेव ग्रह मंदिरात भूमीमाताचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध आहे भाविकांनी कोरोना नियम पाळून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.