(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) धानोरा येथील हत्ती पाऊल धरणांमध्ये मामा आणि दोन भाच्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज (ता १८) सकाळी उघडकीस आली. त्यामुळे धानोरा महासिद्ध या गावावर शोककळा पसरली आहे. काल रात्रीपासून बेपत्ता असल्याची माहिती पिलीस पाटील यांनी पोलिसांनी दिली होती.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार १७ मे दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान पुणे येथे नोकरीला असणारा २७ वर्षीय विनायक घाडगे हा तरुण लॉकडाऊन मुळे धानोरा येथील राहत्या घरी आला होता. विनायक हा त्याचा काकाचा मुलगा तेजस घाडगे (वय १८) आणि दाताळा मलकापुर येथून आपल्या बहिणीला घ्यायला आलेले मामा नामदेव वानखेडे (वय४३) यांच्यासह धानोरा लघु प्रकल्प परिसरामध्ये फिरायला गेले होते. उन्हाच्या तप्त वातावरणात धरणातील गार पाण्यात पोहण्यास ही मंडळी धरण प्रकल्पात उतरली होती.
तिघांचाही रात्री उशिरा घरी न आल्यामुळे शोध सुरू झाला. त्यानंतर ही माहिती पोलीस पाटलांनी पोलीस स्टेशनला कळवली. त्यानुसार शोध सुरू झाल्यावर धरणाच्या काठावर मोबाईल सह कपडे आढळून आले. मात्र रात्र असल्याने त्यांचा शोध घेता आला नाही. सकाळी पुन्हा शोध घेत असताना पाण्यामध्ये तीन मृतदेह तरंगताना दिसून आले. त्यांची ओळख पटवून तिघेही मृतक हे धानोरा येथील असल्याचे स्पष्ट झाले.