नाशिक राजमुद्रा दर्पण । उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचारप्रकरणी महाविकास आघाडीने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदकडे मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदार संघातील व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. शहरातील अनेक दुकाने उघडी आहेत.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना अत्यंत क्रूरपद्धतीने गाडीखाली चिरडून मारले. या शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करत केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातील योगी सरकारविरोधात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आक्रमक झाले आहे. त्यासाठी त्यांनी आज सोमवारी राज्यव्यापी बंद पुकारला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पक्ष अपेक्षेप्रमाणे जिल्ह्यातील बंदमध्ये सहभागी झाले आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री असणाऱ्या छगन भुजबळ यांच्या येवला मतदार संघात बंदला अल्प प्रतिसाद मिळत आहे. बाजार पेठेतील अनेक दुकाने उघडी आहेत. त्यामुळे येवल्यात तरी व्यावसायिक आणि दुकानदारांनी या बंदला प्रतिसाद दिला नसल्याचे दिसून आले आहे.
या बंदमध्ये आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव बाजार समितीने सहभाग नोंदवला आहे. सोबतच जिल्ह्यातील प्रमुख पंधरा बाजार समित्याही या बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत. नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे. बाजार समितीच्या बाहेर एक मोठा फलक लावून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.