(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) तीन दिवसांआधी जळगावच्या दौऱ्यावर असलेल्या काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा आ. प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना १९ च्या शासकीय नियमांचे उल्लंघन करून बैठक घेण्यात आली होती. या विषयाची शहरात मोठ्या प्रमाणावर टीकाही करण्यात आली होती. याबाबत तक्रार दाखल झाल्यास कारवाई होणार असल्याची शाश्वती देण्यात आली असताना रामानंदनगर पोलीस स्थानकात काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांविरूध्द आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात कडक निर्बंध लागू असतांनाही या बैठकीला नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. यावर टीका होत सर्वसामान्य नागरिक आणि राजकारणी यांना वेगळे नियम आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. याची दखल घेत आज नियमांचे उल्लंघन करून बैठक घेतल्या प्रकरणी कलम १८८ अंतर्गत काँग्रेस नेत्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातून शासनाचे नियम हे सर्वसामान्यांप्रमाणे राजकारण्यांनाही उशिरा का होईना लागू असल्याची प्रचिती जळगावकरांनी आज अनुभवली.