नवी मुंबई राजमुद्रा दर्पण । मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन… असं निवडणूक प्रचाराच्या भाषणात सांगणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ‘मन की बात’ सांगितली आहे. आता तर चक्क त्यांनी मी मुख्यमंत्री नाही असं मला वाटतच नाही, असं जाहीर विधान केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानाने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
देवेंद्र फडणवीस नवी मुंबईत होते. यावेळी एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी हे विधान करून पुन्हा एकदा राजकीय चर्चांना तोंड फोडले आहे. मला अस वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला जनतेने कधीच जाणवू दिलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मी आजही मुख्यमंत्री आहे हेच तुम्ही मला जाणवून दिलं आहे, असं फडणवीस म्हणाले.
मला तर वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे. गेले दोन वर्ष सातत्यानं राज्यभर फिरतोय. लोकांचं प्रेम अजिबात कमी झालेलं नाही. माणूस कोणत्या पदावर आहे ते महत्त्वाचं नाही. तो काय काम करतो हे जास्त महत्त्वाचं, असंही फडणवीस म्हणाले.
गेली दोन वर्ष एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे मला जनतेनेही कधी मी मुख्यमंत्री नसल्याचं जाणवू दिलं नाही. विरोधी पक्षनेता म्हणून मी उत्तम करत आहे. ज्या दिवशी मला जनतेचा आशीर्वाद मिळेल त्या दिवशी इथे मी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येईल. त्यामुळे त्याची काळजी घेऊ नका. मी नक्की येईल. तुमचं निमंत्रण मी आजच स्विकारतो, असंही ते म्हणाले.
आमदार मंदा म्हात्रे या जनसामान्यांचं काम करतात. आगरी, कोळी आणि महिलांच्या विकासाची कामे ते सातत्याने करतात. मुंबई-पुणे एक्सप्रेस हाय वेवर महिलांसाठी फिरते शौचालयाची सोय करणं हे फक्त आमच्या ताईच करू शकतात. आमच्या मंदाताई महिलांचं सशक्तीकरण करण्यात नेहमीच पुढाकार घेत असतात, अशा शब्दात फडणवीस यांनी मंदा म्हात्रे यांचं कौतुक केलं. नवी मुंबईत पुन्हा आम्हीच निवडून येऊ आणि आम्ही पुन्हा एकदा सेवा करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.