हैद्राबाद राजमुद्रा दर्पण । आयकर विभागाने हैदराबादमध्ये टाकलेल्या धाडीनंतर, सोशल मीडियावर कपाटात खचाखच भरलेल्या नोटांचा फोटो व्हायरल झाला आहे. नुकतंच आयकर विभागाने हेटेरो फार्मास्युटिकल ग्रुपवर छापेमारी केली. या छापेमारीदरम्यान आयकर विभागाचे अधिकारीही चक्रावले. कारण, हेटेरो फार्मास्टुटिकलच्या कार्यालयात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना एका कपाटात 142 कोटी रुपये सापडले आहेत. 142 कोटी रुपये रोख रक्कम सापडल्याने चक्रावून जाणं साहजिक आहे. त्यामुळे हे नेमकं प्रकरण काय आहे, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
आयकर विभागाने हैदराबादेतील हेटेरो फार्मास्युटिकल या कंपनीवर धाड टाकली. आयकर विभाग 550 कोटी रुपयांच्या बेहिशेबी संपत्तीची चौकशी करत आहे. याच चौकशीदरम्यान आयकर विभागाला 142 कोटी रुपयांची रोकड सापडली. कपाटात नोटांचा खच किंवा खचाखच भरलेल्या नोटा असा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. आयकर विभागाने हेटेरो फार्मास्युटिकल कंपनीच्या 6 राज्यातील जवळपास 50 ठिकाणांवर छापेमारी केली.
सीबीदीटी च्या म्हणण्यानुसार, हेटरो ग्रुप हा औषध निर्मिती, उत्पादन आणि विक्री उद्योगात आहे. त्याची बहुतेक उत्पादने अमेरिका आणि दुबईसारख्या देशांमध्ये आणि काही आफ्रिकन आणि युरोपियन देशांमध्ये निर्यात केली जातात.
हेटेरो समूह कोविड -19 च्या उपचारासाठी वापरण्यात आलेल्या रेमडेसिविर आणि फेविपीरावीरसारख्या विविध औषधांच्या निर्मितीच्या निमित्ताने प्रकाशझोतात आला होता. या कंपनीची भारत, चीन, रशिया, इजिप्त, मेक्सिको आणि इराणमध्ये 25 हून अधिक ठिकाणी उत्पादन सुविधा आहेत. या फार्मा कंपनीची उलाढाल जवळपास 7500 कोटी रुपये इतकी आहे. या कंपनीने कोविड 19 व्हॅक्सिन Sputnik V च्या निर्मितीसाठी रशियासोबत करार केला होता.
या कारवाईदरम्यान कपाटात भरलेल्या पैशाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. दरवाजे उघडे असलेल्या कपाटात नोटांची थप्पी लागल्याचं या फोटोत दिसत होतं. या थप्पीवरुन रक्कम किती असू शकते याचा अंदाज येऊ शकतो.