साक्री राजमुद्रा दर्पण । भाजप नेत्यांकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा बेसुमार वापर करण्यात येत असून या यंत्रणादेखील पातळी सोडून कारवाया केल्या जात आहेत. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या अधिकारी नव्हे तर बीजेपीचे नेते चालवत आहेत असे वाटत असून राज्यातील मंत्र्यांना बदनाम करण्यासाठी हे धाडसत्र चालवले जात असल्याचे घणाघात आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपावर केले.
येथील बाजार समिती आवारात आयोजित धनगर, ठेलारी समाज मेळाव्याप्रसंगी मंत्री जयंत पाटील बोलत होते. मेळाव्यास सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे देखील उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री जयंत पाटील म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणांचा बेसुमार वापर करण्यात येत असून या यंत्रणा बीजेपीचे नेते चालवत आहे. राज्यातील मंत्र्यांना बदनाम करण्यासाठी हे धाडसत्र चालवले जात आहे. हल्ली दररोज टीव्हीवर धाडी टाकल्याच्या बातम्या दिसत आहेत मात्र यातून काय निष्पन्न होते हे मात्र सांगितले जात नाही. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी आतापर्यंत दहा वेळा धाड टाकली मात्र आधीच्या धाडी मध्ये काय सापडले आणि आता काय आढळून आले याचा कुठलाही खुलासा केला जात नाही. हे केवळ सरकारमधील मंत्र्यांना व सरकारला बदनाम करण्यासाठीच केले जात असल्याचा आरोप मंत्री जयंत पाटील यांनी केला.
देशात शेतकरी प्रश्नावर सरकारच्या विरोधात जी काही आंदोलने होत आहेत ती चिरडण्याचा प्रयत्न केला जातोय. शेतकऱ्यांच्या मोर्चात पाठीमागून गाडी घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न होतोय, हे कृत्य करणारा मंत्र्यांचा मुलागा 5-6 दिवस सापडत नाही, सापडल्यानंतर त्याला पोलीस कोठडी ऐवजी न्यायालयीन कोठडीत ठेवलं जात. देशातील शेतकऱ्यांच्या विरोधात इतकी मोठी कृती झाल्यानंतर देखील देशाच्या प्रमुखांना ना खंत, ना खेद, ना दुःख होतं. यातून कोणती प्रवृत्ती देशात राज्य करते आहे अभ्यासण्याची गरज असल्याचे म्हणत भाजपवर टीकास्त्र सोडले.