जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव जिल्ह्यातील काही ठिकाणी दि. १६ ऑक्टोबला शनिवारी व रविवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी, नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील शेतमालाची काढणी करावी व शेतात साठवणूक केलेला शेतमाल सुस्थितीत योग्य ठिकाणी ठेवावा. जेणेकरुन वरील कालावधीत होणाऱ्या वादळी वारा, अवकाळी पावसापासून शेतमालाचे संरक्षण करणे सोयीचे होईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे पिक काळवडली तसेच शेतात पाणी साचले, नदी, नाल्याला आलेल्या पुरात काठावरील शेतांमध्ये पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नसल्याने शेतकरी हवालदील झाले आहे. त्यामुळे शनिवारी व रविवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊसाची शक्यता वर्तवल्याने शेतऱ्यांनी आपल्या पिकांची व शेतमालाची काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून केले आहे.
जळगाव जिल्हात ३ मोठे धरणे तर १३ लहान धरणे असून यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच धरणे ओसंडून वाहत आहे. सर्व धरणात पाणीसाठा मोठ्या प्रमाणात असल्याने शनिवारी, रविवारी परतिचा पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पून्हा जोरात पाऊस झाल्यास जळगाव जिल्ह्यातील नद्यांना पुर येवून मोठ्या प्रमाणात नुकसानीची शक्यता आहे.