(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) covid-19 च्या महामारीत अग्रक्रमाने काम करणाऱ्यांच्या (फ्रन्टलाइन वर्कर्स) यादीत कोविड योद्धे म्हणून औषध विक्रेत्यांच्या सेवेकडे, तसेच लसीकरणाकडे शासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप अखिल भारतीय व महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेने अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आला. जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे व सचिन झंवर यांनी पत्रकातून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
औषध विक्रेते व औषधालयांमधील कर्मचारी हा आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र कोरोना रुग्णांना सेवा देत असून देशासह महाराष्ट्रात तसेच प्रत्येक स्थानिक पातळीवर औषध पुरवठा कमी पडणार नाही याची दक्षता घेत आहे. मात्र कोरोना रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांशी प्रत्यक्ष संपर्कात येणाऱ्या औषध विक्रेते तथा कर्मचाऱ्यांची कोरोना योद्धे म्हणून दखल घेतली नाही, सोबतच लसीकरणासही प्राधान्य न दिल्यामुळे सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रासह देशात 200 पेक्षा अधिक औषध विक्रेते कोरोनामुळे दगावले असून 1000 पेक्षा जास्त परिवारातील नातेवाईक कोरोनाने बाधित झाले आहेत. असे असतानाही केंद्र तसेच राज्य सरकारने याची कुठल्याही प्रकारे दखल न घेता दुर्लक्षच केले असल्याचा आरोप औषध संघटनेकडून केला जात आहे. वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही दखल न घेतली गेल्याने यापुढे दखल न घेतल्यास नाइलाजास्तव कडक लॉकडाऊन मध्ये सहभाग घेऊन औषध व्यवसाय बंद ठेवण्याचा इशारा औषध संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा औषध संघटनेच्या अध्यक्ष सुनील भंगाळे व सचिन झंवर यांनी दिला आहे.