नागपूर राजमुद्रा दर्पण । महाराष्ट्रातील महिलांवरील वाढते अत्याचार आणि पुण्यात अल्पवीयन कबड्डीपट्टूच्या झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जरा खुट्ट झालं तरी बोंबाबोंब व्हायची. फडणवीसांच्या काळात पाकिटमारी झाली तरी बातम्या चालायच्या, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा पलटवार केला आहे. मला चिंताही व्यक्त करायची आहे आणि जुनी आठवण करून द्यायची आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळी खुट्ट जरी झालं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शहरात पाकिटमारी असं चालायचं. आता नितीन राऊत काय झोपा काढत आहेत का? गुन्हेगारी त्यांना दिसत नाही का? असा संतप्त सवाल पाटील यांनी केला.
आता नागपूरमध्ये होणाऱ्या गुन्हेगारीकडे सरकारचे लक्ष नाही का? राज्यात महिला असूरक्षित झाल्या आहेत. पूर्वी महिला रात्री कितीही उशिरा घरी यायच्या एवढ्या सुरक्षित होत्या. केवळ देवेंद्र फडणवीसांमुळे झालं असं नाही. पण महाराष्ट्र असा होता. आता तो संपूर्ण रसातळाला गेला आहे. घरातल्या कुणाला तरी बरोबर घेतल्याशिवाय बाहेर पडता येत नाही, असं सांगतानाच या स्थितीवर सुप्रिया सुळे का बोलत नाहीत?, त्या महिला आहेत. त्यांना जसे माझ्या काळात रस्त्याचे खड्डे दिसायचे. त्या सेल्फी काढायच्या. त्यांना हे सर्व बलात्कार आणि कोयत्याने वार करणं दिसत नाहीत का?, निलमताई कुठे आहेत? त्या तर महिलांच्या अन्यायावर खूप बोलायच्या. त्या विद्याताई चव्हाण कुठे आहेत?. अक्षरश सत्तेसाठी किती अॅडजेस्टमेंट करायची महिलांच्या सुरक्षेसाठीही अॅडजेस्टमेंट करायची, अशी टीकाही त्यांनी केली.
कोळश्याच्या टंचाईवरूनही त्यांनी आघाडी सरकारवर टीका केली. काही झालं तरी त्याचं खापर किंवा दोष केंद्राकडे देऊन मोकळे होतात. कोळसा कमी आहे, केंद्राने कोळसा दिला नाही, असं सांगितलं जात आहे. पण पावसामुळे कोळसा कमी मिळेल. कोळश्याचा स्टॉक करून ठेवा हे केंद्राने आधीच सांगितलं होतं हे ते सांगणार नाहीत. केंद्राच्या इशाऱ्यानंतरही कोळश्याचा साठा करण्यात कमी पडलो हेही ते सांगणार नाहीत, अशी टीका पाटील यांनी केली.