पुणे राजमुद्रा दर्पण । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सावरकरांचं हिंदुत्व हेच खरं राष्ट्रीयत्व आहे असं म्हटलं होतं. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भागवत नवीन काय म्हणाले? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हे या आधीच सांगितलेलं आहे, असं सांगतानाच मोहन भागवत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला सावरकरांविषयी एवढंच प्रेम आलं असेल तर सावरकरांना भारतरत्न कधी देणार ते सांगा?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं. यावेळी त्यांचं मोहन भागवतांच्या विधानाकडे लक्ष वेधण्यात आलं. त्यावर मोहन भागवतांनी नवीन काय सांगितलं? बाळसााहेब ठाकरेंनी वारंवार हेच सांगितलं आहे. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हा विचारच बाळासाहेबांचा आहे, असं सांगतानाच संघाने आता कोणत्या भूमिका घ्याव्यात आणि कधी घ्याव्यात हा त्यांचा प्रश्न आहे. पण वीर सावरकरांच्या संदर्भात शिवसेनेची भूमिका कायम तीच राहिली आहे. वीर सावकर हे आमचे कायम आदर्श राहिले आणि राहतील. म्हणून आजही सांगतो मोहन भागवत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भाजपला सावरकरांविषयी प्रेम आलंय तर त्याचं आम्ही स्वागत करतो. फक्त त्यांना भारतरत्न केव्हा देणार एवढच विचारतो, असं राऊत म्हणाले.