मुंबई राजमुद्रा दर्पण । राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका, अशा बोचरा वार भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांचं नाव न घेता केलाय. चाकणकरांची निवड झाली तर प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल, असा सल्ला त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी रुपाली चाकणकरांचं नाव निश्चित झालंय. त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
धनंजय मुंडे आणि मेहबूब शेख प्रकरणात भाजपने केलेल्या आरोपांना रुपाली चाकणकर यांनी सडेतोड उत्तर देत पक्षातील नेत्यांसाठी बॅटिंग केली होती. आरोप होत असतात, चौकशी होते आणि दोषी असेल तर न्यायालय शिक्षा देतं, तुम्ही त्यांना अगोदरच दोषी का ठरवताय? असे सवाल चाकणकर सातत्याने भाजप नेत्यांना विचारत राहिल्या. अनेकवेळा चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये याच प्रकरणांवरुन खडाजंगीही झाली. आता महिला आयोगाच्या अध्यक्षपदी चाकणकर यांचं नाव चर्चेत येताच किंबहुना अधिकृत घोषणेच्या शक्यतेअगोदरच चित्रा वाघ यांनी चाकणकरांवर घणाघाती हल्ला चढवून दोघींमधल्या वादाच्या पुढच्या अंकाची कशी सुरुवात होणार आहे, याची झलक दाखवून दिलीय.
चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, “महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजीरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका.अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल”
गेल्या अनेक दिवसांपासून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाच्या नावाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आता ही जबाबदारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या खांद्यावर येण्याची शक्यता आहे. गेले दीड ते दोन वर्ष हे पद रिक्त होतं. महिला अत्याचारांवरुन विरोधकांकडूनही महाविकास आघाडी सरकारवर होत असलेल्या टीकेमुळे लवकरच महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर आघाडीतील महिला नेत्याची वर्णी लागणार, अशी चर्चा होती.
रस्त्यावरची आंदोलनं ते भव्य व्यासपीठ आणि हजारोंच्या गर्दीत रुपाली चाकणकर यांचं वेगळेपण पाहायला मिळतं. विषयांची मुद्देसूद मांडणी, सडेतोड उत्तर, करारीपणा, कधी कोट्या करुन विरोधकांना नामोहरम करणं यासाठी रुपाली चाकणकर ओळखल्या जाऊ लागल्या आहेत.
दौंडमधील शेतकरी कुटुंबात चाकणकर यांचा जन्म झाला. रतत शिक्षण संस्थेतील साधना महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतलं. पुढे त्यांनी अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांचाही अभ्यास केला. लग्नानंतर सासरच्या चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे रुपाली चाकणकर यांचाही राजकारणात प्रवेश झाला.