मुंबई राजमुद्रा दर्पण । दसरा मेळाव्या निमित्ताने उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असतानाच शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार का? असा सवाल केला जात आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या मेळाव्याला महाविकास आघाडीच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं नसल्याचंच राऊत यांनी सांगितल आहे.
दसरा मेळाव्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, आमची मुलुख मैदानी तोफ उद्या धडाडणार आहे. कोरोना नियमांचं भान ठेवून हा मेळावा होईल. शिवसेनेची रॅली ऐतिहासिक असते. शिवाजी पार्कवर ही रॅली होते. लाखो लोक उपस्थित राहत असतात. पण कोरोनामुळे दोन वर्ष रॅली झाली नाही. यावेळी शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याचा विचार होता. पण हजारो लोक जमून कोरोना नियमांचा भंग होऊ शकतो. त्यामुळे षण्मुखानंदमध्ये मेळावा घेण्याचं ठरलं आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे रोखठोक मते मांडतील. देशाच्या, राज्याच्या राजकीय घडामोडींवर ते भाष्य करतील, असं राऊत म्हणाले. या मेळाव्याला महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार का? असा सवाल करताच हा मेळावा शिवसेनेचा असतो. तो शिवसेनेचा दसरा मेळावा आहे, असं त्यांनी सांगितलं.
देशात इंधनाचे दर वाढले आहेत. त्याबाबत विचारलं असता तो राक्षस 2024मध्ये आपल्याला जाळायचा आहे. त्याची सुरुवात उद्यापासून करू, असं सूचक विधान त्यांनी केलं. यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली. चंद्रकांत पाटील बोलतात त्यांना बोलत राहू द्या. त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही. त्यांच्या बोलण्याने महाराष्ट्राला फरक पडत नाही. ते रोज बोलतात. बोलू द्या. विरोधी पक्षाचे काम आहे तोंडाच्या वाफा दवडणं. दवडू द्या, असा घणाघाती हल्लाही त्यांनी केला.