मुंबई राजमुद्रा दर्पण । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून चांगलीच जुंपली आहे. मुख्यमंत्रीपदाचं स्मरण राहणं चांगली गोष्ट आहे, अशी मिष्किल टिप्पणी पवार यांनी करताच पवार पाच वर्ष कधीच मुख्यमंत्री नव्हते असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी फडणवीसांविषयी विधान केलं होतं. पाच वर्ष सत्तेत राहिल्यानंतर आपण सत्तेत आहोत याचं स्मरण ठेवणं ही चांगली गोष्ट आहे. मी चार वर्ष मुख्यमंत्री होतो पण माझ्या लक्षात कधी राहिलंही नाही. ही आमची कमतरता आहे हे मी कबूल करतो, असं सांगतानाच सत्ता गेल्याची वेदना किती सखोल आहे हे यातून दिसून येतं. सत्ता येते जाते याचा फारसा विचार करायचा नसतो, असा सल्लाही पवार यांनी दिला.
फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या विधानाची पवारांनी खिल्ली उडवली होती. त्यावरही फडणवीसांनी उत्तर दिलं. पवार मोठे नेते आहेत. ते चार वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. पण कधीच ते पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले नाही. राहिले असते तर त्यांनी चांगलं काम केलं असतं. कधी दोन वर्ष, कधी तीन वर्ष त्यांनी काम केलं. त्यावेळच्या परिस्थितीमुळे त्यांना राहता आलं नाही. पण मी विरोधी पक्षनेता म्हणून समाधानी आहे. त्यामुळेच सत्ताधारी अस्वस्थ आहेत, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
पवारांनी सर्वात आधी 18 जूलै 1978मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. ते राज्यातील सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. पुलोदच्या प्रयोगामुळे ते मुख्यमंत्री झाले होते. परंतु, 1980मध्ये इंदिरा गांधींचे केंद्राच्या सत्तेत पुनरागमन झाले. त्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली. त्यात पवारांचे सरकारही बरखास्त झाले. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदाची अवघे दोनच वर्ष मिळाली.
6 डिसेंबर 1992मध्ये बाबरी मशीद पडली. त्यामुळे देशात दंगली सुरू झाल्या. मुंबईत प्रचंड जाळपोळ सुरू झाली होती. त्यामुळे मार्च 1993मध्ये शरद पवारांना मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेऊन मुंबई रुळावर आणली. 1993 ते 1995पर्यंत म्हणजे दोन वर्षच पवार मुख्यमंत्रीपदी होते. त्यानंतर पवार दिल्लीच्या राजकारणात गेले.