मुंबई राजमुद्रा दर्पण । देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. चालू महिन्यात 13 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. अनेक राज्यांत आता डिझेलनेही शंभरचा टप्पा ओलांडला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव वाढल्याने पुढील काळात पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा भडका कायम राहण्याची शक्यता आहे. खनिज तेलाचे भाव मागील सात वर्षांतील उच्चांकी पातळी आहेत. खनिज तेलाचा भाव वाढल्याने आगामी काळात देशात इंधन दरवाढीचे चक्र कायम राहणार आहे. आगामी काळात हे चटके आणखी वाढण्याची शक्यता आहे. दिल्लीत आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 35 पैसे तर डिझेलच्या दरात 35 पैसे वाढ करण्यात आली. याचवेळी मुंबईत आज पेट्रोल आणि डिझेल दोन्हीही 38 पैशांनी महागले.
दिल्लीत पेट्रोलचा दर 105.14 रुपये तर मुंबईत 111.09 रुपयांवर गेला आहे. डिझेलचा दर दिल्लीत 93.87 रुपये आणि मुंबईत 101.78 रुपयांवर पोचला आहे. देशातील चार राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर 2 मेपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. यामुळे सामान्य नागरिकांना इंधन दरवाढीचे चटके बसत आहेत. देशात 4 मे ते 17 जुलै या कालावधीत पेट्रोलच्या दरात 11.44 रुपये आणि डिझेलच्या दरात 9.14 रुपये वाढ झाली आहे. चालू महिन्यात पेट्रोल, डिझेलची दरात 13 दिवस वाढ झाली आहे.
सध्या देशात इंधनाचे दर ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. पेट्रोलच्या दराने देशभरात शंभरी ओलांडली होती. आता डिझेलच्या दरानेही शंभरी ओलांडण्यास सुरवात केली आहे. अशातच स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरातही वाढ सुरू आहे. चालू वर्षात एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 205 रुपयांची वाढ झाली आहे. दिल्ली आणि मुंबईत विनाअंशदानित गॅस सिलिंडरची किंमत 900 रुपयांवर पोचली आहे.