जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव येथे नेहरू चौक बहुउद्देशीय मित्रमंडळातर्फे विजयादशमीनिमित्त भगवान श्रीराम व भारत मातेच्या प्रतिमांचे पूजन व ध्वज पूजन करण्यात आले. यावेळी आकर्षक रांगोळी आणि फुलांनी सुशोभित केल्यामुळे महापालिका परिसर हा मंगलमय झालेला दिसून आला. विजयादशमीच्या दिवशी शुक्रवारी दि. १५ ऑक्टोबर रोजी महानगरपालिकेच्या इमारतीखाली श्री नेहरू चौक मित्र मंडळातर्फे विविध प्रकारच्या रांगोळ्या व फुलांनी चौक सुशोभित करण्यात आला होता. तसेच या ठिकाणी उभारलेला ध्वजस्तंभ लक्ष वेधून घेत होता. यामुळे परिसर चैतन्यमय झाला होता. सकाळी दहा वाजता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या हस्ते ध्वजस्तंभाचे पूजन झाले.
शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी भगवान श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन केले. महापौर जयश्री महाजन यांनी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर यावेळी भगवान श्रीराम आणि भारत माता यांचा विजयी घोष झाला. यानंतर भगवान श्रीराम आणि भारत माता यांची आरती करण्यात आली. यावेळी महापौर जयश्री महाजन, आ. सुरेश भोळे व सर्व मान्यवरांनी उपस्थित सर्वांना विजयादशमीच्या आरोग्यमयी शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी नगरसेवक किशोर भोसले, अमित भाटिया, बजरंग दलाचे ललित चौधरी, दीपक जोशी, रमेश तलरेजा, मनोहर नाथाणी, राजेंद्र वाणी, रमाकांत महाराज, युवासेना पदाधिकारी पियुष गांधी, महानगरप्रमुख विशाल वाणी, स्वप्नील परदेशी यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी आणि जळगावचा राजा नेहरू चौक बहुउद्देशीय मित्र मंडळाचे सर्व सेवक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.