(धरणगाव राजमुद्रा वृत्तसेवा) धरणगाव तालुक्यातील भोद येथील, धरणगाव व एरंडोल तालुका शेतकी संघाचे संचालक तथा भाजपचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र रायभान पाटील (वय ५४) यांनी पत्नी वंदनाबाई राजेंद्र पाटील (वय-४८) व मुलगी ज्ञानल राजेंद्र पाटील (वय २१) यांच्यासह शिंदखेडा तालुक्यातील दभाशी जवळ नदी पुलावरून तापीनदीत उडी घेत सामुहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.
राजेंद्र रायभान पाटील यांची MH19 PA 1094 क्रमांकाची टाटा इंडिका गाडी गेल्या दोन दिवसांपासून पुलावर बेवारस अवस्थेत लागून होती. 17 मे रोजी सकाळी ते परिवारासह अमळनेर तालुक्यातील भरवस येथे सासरवाडीला गेले होते. येथे उत्तराकार्याचा कार्यक्रम असल्याने राजेंद्र पाटील पत्नी व मुलीसह सासरवाडीला आले असल्याचे सांगण्यात आले. दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास राजेंद्र पाटील आपल्या घरी भोद येथे जाण्यासाठी निघाले मात्र ते भोदला पोहचलेच नाही. दरम्यान सायंकाळी ६ वाजेनंतर त्यांची गाडी शिंदखेडा तालुक्यातील दभाशी गावानजीक तापी नदीवर असलेल्या पुलावर लागलेली दिसली. काल (ता १८) दुपारी ४ वाजता राजेंद्र पाटील यांचे प्रेत नदीत तरंगतांना दिसल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. रात्री उशिरा राजेंद्र पाटील यांच्या मुलीचा मृतदेह सुध्दा तरंगतांना दिसला. दरम्यान, राजेंद्र पाटील यांच्या पत्नीचा शोध लागला नसून आज (ता १९) पुन्हा शोधमोहीम सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
घटनास्थळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील दाखल झाले असून मदत कार्यात सहभागी झाले आहेत. त्यांच्या सोबत गुलाब बाबा पाटील व भोद येथील सरपंच राजेंद्र पाटील देखील मदतकार्यात सहभागी आहेत. यासंदर्भात शेतकी संघाचे माजी अध्यक्ष रमेश पवार व पणन संघाचे संचालक संजय पवार यांनी शोक व्यक्त केला.