जळगाव राजमुद्रा दर्पण । डॉ. ज्योती परब यांच्या चित्रमय रामायण पुस्तकाचे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या चित्रमय रामायण पुस्तकातील प्रसंग चित्रमय स्वरुपात रेखाटन करणारे जळगाव येथील राज्य पुरस्कार प्राप्त कला शिक्षक व चित्रकार लिलाधर कोल्हे (एल.झेड.कोल्हे) यांना अखिल भारतीय कला, क्रीडा व सांस्कृतिक अकादमीच्या वतीने बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते ‘कलागौरव पुरस्कार-२०२१’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
मुलांना वाचनाची गोडी लागावी या दृष्टीने सातत्याने प्रयत्नशील असलेल्या लेखिका व संकल्प इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. ज्योती शंकर(राज) परब यांनी लिहिलेल्या प्रभू रामचंद्र आणि सीतामाई यांच्या संघर्षाची कथा चित्रमय रामायण या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते झाले. वाचन प्रेरणा दिन(भारतरत्न ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती) आणि दसरा याचे औचित्य साधून पुणे येथे बाबासाहेबांच्या निवासस्थानी सदर छोटेखानी प्रकाशन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कला शिक्षक एल.झेड कोल्हे यांनी अल्पवेळेत साकार केलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रतिमा बाबासाहेबांना भेट देण्यात आली.हुबेहुब व बोलकी असलेली प्रतिमा पाहुन बाबासाहेबांनी एल.झेड.कोल्हे यांचे कौतुक केले. आपल्या आशिर्वादपर शुभेच्छा देताना सांगितले की डॉ. ज्योती परब यांनी लिहिलेले पुस्तक हे अबालवृद्धांना आवडेल. विशेषत: यामध्ये लिलाधर कोल्हे यांनी काढलेल्या आकर्षक रंगीत चित्रांमुळे मुलांना कथा आकलन करणे सोपे जाईल असे ही सांगितले.
पुस्तक प्रकाशन समारंभासाठी साहित्य गौरव संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मधुसूदन घाणेकर, भावकवी व महाकवी कालिदास संस्थेचे संस्थापक वि. ग. सातपुते तथा आप्पा, ज्येष्ठ कवियत्री मंदाताई नाईक, साहित्यिका उर्मिलाताई कराड ,समाजसेवक दिवाकर घोटीकर,पत्रकार हेमंत नेहेते, हिंदीचे गाढे अभ्यासक व साहित्यिक प्रा. महेंद्रदास ठाकूर, डॉ राज परब,प्रा.योगेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.