मुंबई राजमुद्रा दर्पण । महाविकास आघाडी पाच वर्षे टिकेल आणि नंतरही सत्तेत येईल इति शरद पवार. महा विकास आघाडीचे भवितव्य जनतेने एकदा पंढरपूरला दाखवून दिलेच आहे. आता परत देगलूर बिलोलीलाही दिसेल. बाकी ‘दिवसाढवळ्या स्वप्न बघायला आपल्या देशात कोणालाही बंदी नाही’, असं ट्वीट करुन भातखळकर यांनी पवारांवर निशाणा साधलाय.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी रविवारी रणशिंग फुंकल्याचं पाहायला मिळालं. पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यावेळी पवारांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणत होते की मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. पण ते आतापर्यंत आलेच नाहीत. भाजपचे नेते सांगतात महाविकास आघाडीचे सरकार आज पडेल, उद्या पडेल. पण दोन वर्षे झाली, सरकार खंबीरपणे उभं आहे. उद्धव ठाकरेंचे सरकार आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. जर महाविकास आघाडी अशीच अबाधित राहिली तर पुढेही उद्धव ठाकरेंचे सरकार सत्तेत येईल. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना नेतृत्व कोणाकडे द्यायचे याचा निर्णय घेण्यासाठी तिन्ही पक्षातील नेते आणि आमदारांची बैठक झाली. त्यावेळी आमच्याकडे दोन तीन जणांची नवे पुढे आली. परंतु मी कुठलाही वेळ ना लावता उद्धव ठाकरेंचा हात धरुन वर केला. आणि उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर केले. मात्र उद्धव ठाकरे तयार नव्हते. मात्र माझ्या एका शब्दावर त्यांनी मुख्यमंत्री होण्याचे मान्य केलं, असा दावा शरद पवार यांनी केला आहे.
केंद्र सरकारच्या सर्व यंत्रणा राज्य सरकारला त्रास देण्यासाठी काम करत आहेत. राज्य सरकारमधल्या अनेकांना त्रास दिला. पण काही होत नाही हे पाहिल्यावर जरा मोठ्याला हात घालू म्हणून अजित पवार यांच्या कुटुंबियांवर धाडी टाकल्या जात आहे. पण ईडी-फिडी काहीही येऊ द्या, हे सरकार पडणार नाही. आता सत्ता त्याच्या हातात आहे म्हणून ते काही करत आहेत. हे फार दिवस चालत नाही. देशावर भाजप म्हणून जे संकट आलंय ते दूर करायचं आहे, असं आवाहनही शरद पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये बोलताना केलंय. ज्याच्या हातात सत्ता दिली त्यांनी शहराचं वाटोळं केलं. त्यांना खड्यासारखं बाजूला करा. ज्यांनी शहर घडवलं त्या राष्ट्रवादीच्या हातात पुन्हा सत्ता द्या, असंही पवार यावेळी म्हणाले.