मुंबई राजमुद्रा दर्पण । राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले आहेत. पवार आणि मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलही पोहोचल्याने बैठकीत काय चर्चा होणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांची मॅरेथॉन बैठक होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, परिवहन मंत्री अनिल परब आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित आहेत. या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार हे गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
काही दिवसांपासून पवारांच्या निकटवर्तीयांच्या घर, कार्यालयांवर धाडी पडल्या आहेत. एक दोन दिवस नाही तर सहा सहा दिवस आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी पवारांच्या निकटवर्तीयांच्या घरावर छापे मारले आहेत. तसेच भाजपचे नेते या कारवाईत बरंच घबाड सापडल्याचा दावाही करत आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांदरम्यान चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याशिवाय राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी नुकतच दहा हजार कोटींचं पॅकेज दिलं होतं. हे पॅकेज तुटपूंजं असल्याचं खुद्द शिवसेनेच्या नेत्यांनीही म्हटलं होतं. हे पॅकेज वाढवून देण्याबाबतही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
या बैठकीत राज्यातील वीज संकट, कोळश्याचा पुरवठा, एसटीची परिस्थिती आदी मुद्दयांवरही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच केंद्र सरकारकडे राज्याचे जीएसटीचे आणि इतर किती पैसे बाकी आहेत यावरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच राज्यातील जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल आणि आगामी निवडणुकांसंदर्भातही या बैठकीत चर्चा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पवारांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाने धाडी मारल्यापासून शरद पवार सक्रिय झाले आहेत. गेल्या आठवडाभरात पवारांनी तीनदा मीडियाशी संवाद साधून आयकर विभागाच्या कारवायांवरून केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. लखीमपूर हिंसा, चीनशी निष्फळ ठरलेली चर्चा आणि इतर मुद्द्यांवरूनही पवारांनी केंद्राला घेरले होते. त्यावरही या बैठकीत चर्चा होऊ शकते असं बोललं जात आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीला केवळ राष्ट्रवादीचे नेतेच उपस्थित आहेत. या बैठकीत काँग्रेसच्या एकाही नेत्याला किंवा मंत्र्याला बोलावण्यात आलेलं नाही. त्यामुळेही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.