जळगाव राजमुद्रा दर्पण । भुसावळ शहर वाहतूक शाखेकडे कागदपत्र सादर न केलेल्या व स्टिकर नसलेल्या रिक्षाचालकांवर सोमवार पासून वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यात येणार आहे.
अधिकृत रिक्षा चालकांना ओळखणे सोपे व्हावे म्हणून भुसावळ शहरातील रिक्षा चालकांकडील कागदपत्रे तपासून, रिक्षांवर अधिकृत स्टीकर लावण्याची मोहीम शहर वाहतूक शाखेकडून गेल्या १५ दिवसांपासून राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत भुसावळ शहर वाहतूक शाखेकडे कागदपत्रे सादर करणाऱ्या चालकांच्या १५०० रिक्षांवर शहर वाहतूक शाखेच्या पाेलिसांनी अधिकृत स्टिकर लावले आहेत. या मोहीमेला १५ दिवसांचा कालावधी उलटूनही अनेक रिक्षा चालकांनी अद्याप कागदपत्रे सादर केलेली नाहीत. त्यामुळे वाहतूक शाखेकडून अशा स्टिकर नसलेल्या रिक्षाचालकांवर साेमवार दि.१८ पासून कारवाई केली जाणार आहे. स्टिकर नसलेल्या रिक्षा पाेलिस ताब्यात घेणार असल्याची माहिती डीवायएसपी साेमनाथ वाघचाैरे यांनी दिली आहे.