जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात जोरदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील बहुतांश धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे. त्यामुळे अनेक धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. जिल्ह्यात यंदा पावसाने उशिरा हजेरी लावली असली तरी सध्या वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे वाघूर धरण शंभर टक्के भरले आहे. आज सोमवारी सकाळी वाघूर धरणाचे ४ दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यातून २७०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. वाघूर १०० टक्के भरल्याने जळगावकरांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. बोरी धरणाची पाणी पातळी २६७.१० मीटरवर गेली आहे. त्यामुळे बोरी धरणाचे रात्री २ वाजेला ३ दरवाजे ०.१० मीटरने उघडण्यात आले. त्यामधून ९०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सुरु आहे.
हतनूर धरण १०० टक्के भरलं असून धरणाचे आज सकाळी ६ वाजता ८ दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यातून ६४,९८० क्यूसेस पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात सोडण्यात आला आहे. पावसाळ्याच्या सुरवातीपासून हतनूरमधून सुरु असलेला विसर्ग अद्यापही सुरु आहे.
मन्याड धरण देखील ओव्हर फ्लो झालं आहे. ओव्हर फ्लोमुळे धरणातून ४१७.५० क्यूसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. तर मोर मध्यम प्रकल्पाची जलपातळी ३२५.६० मी इतकी असून धरणातील एकूण पाणीसाठा ९.५०५ दलघमी इतके आहे. मोर मध्यम १०० टक्के भरले असून धरणाचे २ दरवाजे उघडण्यात आले आहे. प्रकल्पातून १७३.७४ क्यूसेस पाण्याचा विसर्ग होत आहे.
मंगरूळ मध्यम प्रकल्प देखील १०० टक्के भरले असून धरण ओव्हरफ्लो झाले आहे. यामुळे प्रकल्पातून १३८.०८ क्युसेक्स पाणी वाहत आहे. मंगरूळ प्रकल्पाची जलपातळी ३३१.६० मी.इतका असून प्रकल्पात एकूण पाणीसाठा 8.982 दलघमी इतका आहे. आजचा उपयुक्तसाठा – 6.407 दलघमी एवढा आहे.
गिरणा धरणाचे आज सकाळी २ दरवाजे उघण्यात आले आहे. धरणातून २४७६ क्यूसेस इतक्या पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गिरणा धरणाची वॉटर लेव्हल ३९८.०७० मीटर इतके असून धरण १०० टक्के भरले आहे. तर बहुळा मध्यम प्रकल्पाचे ९ दरवाजे १० सें.मी. ने उघडण्यात आले असून धरणातून ३०९२ क्यूसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. बहुळा प्रकल्पाची वॉटर लेव्हल २५१.७० मी इतकी आहे. हिवरा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून धरणातून १९७ क्यूसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. तर अग्नवती मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले असून धरणामधून २५ क्यूसेस पाण्याचा विसर्ग होत आहे.
दरम्यान, यंदा सुरवातीला पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरवली असल्याने धरणांची जलपातळी अधिकच खालावली होती. परंतु सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून सुरु असलेल्या पावसाने जिल्ह्यातील बहुतांश धरण पूर्ण भरली असून धरणांतून पाण्याचा विसर्ग होत आहे. मध्यंतरी झालेल्या दमदार आणि आता परतीच्या पावसाने जिल्हावासियांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न किमान वर्षभरासाठी तरी मिटला आहे.