जळगाव राजमुद्रा दर्पण | गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेमध्ये आयाराम- गयाराम यांचे सत्र सुरू आहे. त्यासोबतच भाजपमधील बंडखोरांनी शिवसेनेची घट्ट मैत्री केल्याने शिवसेनेची ताकद आणखी मनपा मध्ये वाढली आहे. गेल्या तीन दिवसापूर्वी काही बंडखोर नगरसेवक पुन्हा भाजपा मध्ये आल्याने राजकीय खळबळ उडाली होती. मात्र पुन्हा एकदा हे संपत नाही तोवर भाजपमधील जुने-जाणते नाराज नगरसेवक सेनेला जाऊन मिळाल्याची चर्चा आहे. याबाबतच्या राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा पाचोरा दौरा या मध्ये या भाजपा नगरसेवकांची बैठक झाल्याचे कळते आहे.या मध्ये उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी ही बैठक घडवून आल्याचे समजते. तर भाजप मध्ये घरवापसी केलेले काही नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा बंडखोरां मधील काहींनी केला आहे. मात्र या वृत्ताला अद्याप पर्यंत लोकप्रतिनिधींनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
आर्थिक श्रोता मध्ये आम्ही उपेक्षितच राहिलो अशी नाराजी भाजपमधील काही जुने – जाणते नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. भाजपसोबत बंडखोरी करत काही नगरसेवक सेनेच्या गळाला लागले होते. यामध्ये त्यांच्यासोबत आर्थिक देवाण-घेवाण संबंधितांकडून करण्यात आली पुन्हा भाजपामध्ये घरवापसी करताना त्याच नगरसेवकांना आर्थिक तसेच योग्य पद देण्यात येईल असा शब्द देखील देण्यात आला आहे. मात्र आम्ही या सर्व घडामोडींमध्ये आर्थिक दृष्ट्या उपेक्षितच राहिले असल्याचा नाराजीचा सूर भाजपाच्या काही नगरसेवकांमध्ये असल्याचे कळते. बंडखोरी करून सुद्धा पुन्हा काही नगरसेवकांची घरवापसी करण्यात आली त्यातच योग्य तो पदाचा दर्जा देण्यात येईल अशीसुद्धा ऑफर त्यांना देण्यात आली असल्याची चर्चा आहे. आम्ही पक्षनिष्ठा ठेवली असताना देखील अद्याप पर्यंत न्याय मिळालेला नाही. यामुळे भाजपच्या काही जुन्याजाणत्या नगरसेवकां मध्ये नाराजीचा सूर असल्याचे राजकीय सूत्रांकडून कळाले आहे.
राज्याचे नगरविकास मंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी अचानक गुप्तपणे पाचोरा येथे गुप्त दौरा केला. या दौऱ्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण नियोजन करण्यात आल्याचे समजते आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगाव महापालिकेत नगरसेवकांना ठाणे येथे सुरक्षितपणे ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली होती. यामुळे जळगाव महापालिकेत शिवसेनेची सत्ता आणण्यास शिंदे यांच्या नेतृत्वात यश मिळाले. यामध्ये कुलभूषण पाटील यांची भूमिका महत्त्वाची होती. यामुळे त्यांना उपमहापौर पद देण्यात आले. मात्र पुन्हा बंडखोर नगरसेवक यांमधील एकूण 13 नगरसेवकांनी भाजपा मध्ये जाऊन घरवापसी केल्याने शिवसेनेला राजकीय धक्का बसला होता. त्या पार्श्वभूमीवर मंत्री एकनाथ शिंदे यांनी पाचोरा येथे गुप्त दौरा करीत आढावा घेतला आहे. यात काही नगरसेवक कुलभूषण पाटील यांच्या माध्यमातून पुन्हा गळाला लावल्याची चर्चा आहे.