चंदीगड राजमुद्रा दर्पण । पंजाबमधील काँग्रेसचे नेते तसेच मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागल्यामुळे नाराज असलेले कॅप्टन अमरिंदर सिंग अखेर नवा पक्ष स्थापन करणार आहेत.त्यांनी स्थापन केलेल्या पक्षाची भूमिका काय असेल तसेच पक्षाचे नाव काय असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र त्यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या आंदोलनावर भाजपने तोडगा काढला तरच भाजपशी युती करु असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. विशेष म्हणजे सिंग यांचा पक्ष विधानसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा लढवणार आहे.
काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. काँग्रेस नेतृत्वाने कॅप्टन अमरिंदर सिंग यांना राजीमाना देण्याचे आदेश दिले. तसेच चरणजीत सिंह चन्नी यांच्याकडे पंजाबचा कारभार सोपवला. याच कारणामुळे मागील अनेक दिवसांपासून अमरिंदर सिंग नाराज होते. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी थेट दिल्लीची वारी करुन भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. याच कारणामुळे ते भाजपत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्यांनी आता भापजमध्ये थेट प्रवेश न करता नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तसेच पक्षस्थापनेनंतर ते भाजपशी युती करण्याची शक्यता करतील असे सांगितले जात आहे.
दरम्यान, आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग काँग्रेसवर तसेच काँग्रेस नेतृत्वार प्रचंड नाराज आहेत. आपली नाराजी त्यांनी यापूर्वी उघडपणे बोलून दाखवलेली आहे. राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा त्यांच्या मुलांप्रमाणे आहेत, मात्र पंजाबसाठी त्यांचं जे धोरण राहिलं आहेत, त्यातून त्यांच्यात अनुभवाची कमी साफ दिसते. हेच नाही तर त्यांनी पक्षात आपल्याला अपमानित झाल्यासारखं वाटतं, असं म्हणत त्यांनी आपलं दु:ख जाहीरपणे बोलून दाखवलं होतं.