जळगाव राजमुद्रा दर्पण । महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी पाचोरा जिल्हा जळगाव येथे खाजगी दौरा केला दरम्यान या दौऱ्यात ते पाचोरा शहरातील कृष्णापुरी भागात राहणाऱ्या गजानन नामक तरुण ज्योतिषाकडे आपला हात दाखवण्यासाठी आले असल्याची चर्चा शहरात होत आहे.
दरम्यान, या खाजगी भेटीवेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या जळगाव व पाचोरा येथे काल (ता.१९) झालेल्या गुप्त भेटीने खळबळ उडाली आहे .पाचोरा येथे भेटीच्या वेळी आमदार किशोर पाटील यांच्यासह केवळ एक ते दोन जण एवढेच उपस्थित होते.
ज्योतिष गजानन यांचे घरी थेट नामदार शिंदे यांनी दुपारी १२ वाजेच्या सुमारास भेट देत चर्चा केली. एका खाजगी खोलीत फक्त शिंदे व ज्योतिषी दोघांनी सुमारे तासभर चर्चा केली. यानंतर शिंदे यांनी तात्काळ रस्त्या मार्गे पाचोऱ्याहून जळगाव गाठले व तेथून ते मुंबई रवाना झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
शिंदे हे शिवसेनेतील हेवीवेट मंत्री असून त्यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचे बोलले जाते. नुकताच दसरा मेळाव्यात बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मुख्यमंत्री करून दाखवतो असे जाहीर वक्तव्य केले होते, त्यामुळे तर नामदार शिंदे हे आपले नशीब आजमावण्यासाठी भविष्यकाराकडे गेले नव्हते ना ? अशी चर्चा यानिमित्ताने रंगली आहे.
या भेटीबाबत शिवसेनेकडून गुप्तता पाळण्यात आली होती, शिंदेंनी पाचोरा येथे आमदार किशोर पाटील यांनी घरी बैठक घेतली. महापालिकेत बदलेल्या राजकीय स्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी बैठक घेतल्याचे समजते. पाचोरा येथून जळगाव येथे परत येताना त्यांनी जैन हिल्स येथे भेट दिली त्या ठिकाणी भोजन घेतले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, माजी नगरसेवक अमर जैन उपस्थित होते. तेथून ते विमानतळाकडे रवाना झाले व तातडीने मुंबईला रवाना झाले.