(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा)
देशाचे पंतप्रधान सध्या गुजरात दौऱ्यावर असून तोक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी चर्चा केली असता ‘महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांचे सरकार सर्व संकटांशी सामना स्वबळावर करत आहे. त्यामुळे केंद्र सरकारला असे वाटत असेल की मोदींनी महाराष्ट्रात जाण्याची काही गरज नसावी’ असा टोला लगावला आहे.
उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचं प्रभावी नेतृत्व असल्यामुळे पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र दौरा टाळला असावा. पंतप्रधान ज्या भागात जास्त नुकसान झालं आहे आणि ज्या भागातील सरकार कमजोर सरकार म्हणून गणली जाते फक्त अशा ठिकाणी जाऊन पाहणी करत आहेत. महाराष्ट्र हे कमजोर सरकार नसून स्वबळावर संकटाशी सामना करण्यास सक्षम असल्यामुळे मोदी महाराष्ट्रात आले काय किंवा नाही काय, विशेष फरक पडत नाही असेही ते म्हणाले.
मोदी जरी महाराष्ट्रात आले नसले तरी या घटनेकडे विशेष अशा नजरेने बघण्याची गरज नाही असेही खासदार संजय राऊत म्हणाले. मोदी सरकारच्या या कृत्यावर त्यांच्याकडे वाईट नजरेने बघू नये. गुजरात मध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोबतच महाराष्ट्रातही बऱ्याच प्रमाणावर नुकसान झाले आहे. गोव्यात तर सगळ्यात जास्त नुकसान असतानाही जर पंतप्रधानांना स्वतःच्या गृहराज्यात जाऊन पाहणी करायची असेल तर यावर कोणीही काहीही बोलू नये असे खासदार राऊत म्हणाले.
वास्तविक पाहता देशाचे पंतप्रधान म्हणून जबाबदारी निभावत असतांना मोदींनी प्रत्त्येक राज्यातील वाईट परिस्थितीचा आढावा घेणे आवश्य असतांना फक्त आपल्या स्वगृही जाऊन गुजरातवर लक्ष केंद्रित करणे म्हणजे देशाला वाऱ्यावर टाकण्यासरखे आहे. त्यांच्या या कृत्याची नागरिकांकडून टीका होत आहे. मात्र मोदी याकडे कोणत्या कारणास्तव दुर्लक्ष करत आहेत हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.