धुळे राजमुद्रा दर्पण । राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे केंद्र सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन केले. यावेळी ‘आब की बार महंगाई पर वार’ म्हणत बैलगाडीवरून दुचाकी मोर्चा काढत आंदोलन केले. गेल्या काही महिन्यांपासून इंधनाच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे या इंधन दरवाढीमुळे कंबरडे मोडले आहे. केंद्र सरकारच्या या इंधन दरवाढीच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले आहे. धुळे शहरातील बारा फत्थर या ठिकाणाहून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या निषेध मोर्चाची सुरुवात करण्यात आली.
पेट्रोल नसलेली दुचाकी आंदोलकांनी बैलगाडी वर ठेऊन हा मोर्चा काढला आहे. केंद्र सरकारने गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू असलेली इंधन दरवाढ थांबवावी व सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक देखील थांबवावी अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्यावतीने आंदोलकांनी केली आहे.
केंद्र सरकारच्या महागाईविरोधी धोरणा विरोधामध्ये मोर्चा काढल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने सामील झालेल्या सर्व आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करून आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.