सातारा राजमुद्रा दर्पण । जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वसमावेशक पॅनेल की महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढण्याबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वपूर्ण बैठक आज (गुरुवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात होत आहे. जळगाव जिल्हा बँकेच्या पार्श्वभूमीवर साताऱ्याबाबत अजित पवार काय निर्णय घेणार याचीच आता उत्सुकता आहे.
या बैठकीला पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीची निवडणूक रणनिती या बैठकीत ठरणार आहे. भाजपकडून महाविकास आघाडी सरकार व त्यांच्या मंत्र्यांवर सातत्याने आरोप होत असून ईडी, आयकर कारवाईच्या माध्यमातून त्रास दिला जात आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जळगाव जिल्हा बँकेत भाजपसोबत निवडणूक न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात काय निर्णय होणार याची उत्सुकता आहे.
साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना बरोबर घेऊन निवडणूक सर्वसमावेशक पॅनेलच्या माध्यमातून लढण्याची तयारी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली होती. पण, खासदार उदयनराजे आणि आमदार गोरे यांच्या बाबत निर्णय झालेला नव्हता. तसेच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील कराड सोसायटी मतदारसंघातुन निवडणूक लढणार असताना काँग्रेसचे नेते उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी याच मतदारसंघातुन अर्ज भरला आहे. तर जावळी सोसायटी मतदारसंघातुन आमदार शशिकांत शिंदे लढणार असताना दीपक पवार यांनी अर्ज भरला आहे.
हा महाविकास आघाडीतील नेत्यातील वाद वाढू नये, यासाठीची एकूणच परिस्थितीत लक्ष्यात घेऊन निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात बैठक बोलावली आहे. या बैठकीत श्री. पवार जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करून सर्वसमावेशक पॅनेलमध्ये भाजपच्या नेत्यांना सामावून घ्यायचे की महाविकास आघाडीतील घटक पक्षांना घेऊन निवडणूक बिनविरोध करायची हे ठरविणार आहेत.
विशेष म्हणजे या बैठकीस भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले ही उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याकडे सर्वच मतदारसंघातील सर्वाधिक मते आहेत. त्यांच्या मदतीने जिल्हा बँकेची निवडणूक सोपी होणार आहे. हे लक्षात घेऊन त्यांनाही या बैठकीचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे सर्वसमावेशक की महाविकास आघाडीचे पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक होणार याची अंतिम रणनिती अजित पवार ठरविणार आहेत.