(नाशिक राजमुद्रा वृत्तसेवा)
राज्यात कोरोनाचा हाहाकार माजलेला असून कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यातल्यात्यात कोरोनासाठी महत्वाचे औषध म्हणून रेमडेसिवीरची मागणी वाढली आहे. रेमडेसिवीरचा राज्यात तुटवडा जाणवत असतांनाही काळ्याबाजारात रेमडेसिवीर मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असून काळाबाजार करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला अटक करण्यात नाशिक पोलिसांना यश मिळालं आहे. त्यामुळे आता मोठे रॅकेट हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नाशिकच्या के के वाघ कॉलेजवळ रेमडेसीवीरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला पोलिसांनी पकडले असून त्याच्याकडून माहिती मिळवत पालघरमधून कंपनीत काम करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला ताब्यात घेण्यात आले आहे. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात काळाबाजर होत होता. याआधी काही लोकांना पकडण्यात यश आले होते. यात महिलांचाही समावेश असल्याने खळबळ माजली आहे. या महिला परिचारक म्हणून खासगी रुग्णालयात काम करत होत्या.
पालघरमधून मुख्य सुत्रधाराकडून ६३ इंजेक्शन पोलिसांनी जप्त केली आहेत. यात लेबल नसलेले ६२ तर १ इंजेक्शन लेबल असलेले आहे. आतापर्यंत या टोळीकडून ८५ इंजेक्शन ताब्यात घेण्यात आली असून महिनाभरात विविध गुन्ह्यात नाशिक जिल्ह्यात ११० रेमडीसीविर इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत.
दरम्यान, आतापर्यंत पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. रेमडेसीवीरची जादा दराने विक्री करणाऱ्या चौघांना आडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून चार संशयित आरोपींमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. या तीन महिला खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. पुन्हा एकदा रेमडेसिवीर काळाबाजार होत असल्याने नाशिक पोलिसांनी कार्यवाहीचा बडगा उचलला आहे.
त्याआधी नाशिक शहरात कोरोना प्रतिबंधक औषधांचा काळाबाजार अद्यापही सुरू असल्याचे समोर येत आहे. हाय प्रोफाईल होंडा सिटी गाडीतून रात्रीच्या सुमारास अंधारात रेमडेसिवीर इंजेक्शन विकली जात आहेत. अमोल रमेश जाधव आणि निलेश सुरेश धामणे या दोन तरुणांना अंबड पोलिसांनी अटक केली असून या तरुणांकडून रेमडेसिवीर औषध आणि गाडी जप्त करण्यात आली आहे. राज्यात कोरोनाचा हाहाकार असतांना रेमडीसीविरचा काळाबाजार नाकी नऊ आणत असल्याचे चित्र सध्या दिसून येते आहे.