जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप खासदार रक्षा खडसे, विधानपरिषदेच्या माजी आमदार स्मिता वाघ यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. रक्षा खडसेंनी महिला राखीव तसेच ओबीसी प्रवर्गातून अर्ज दाखल केला होता. स्मिता वाघ यांनी अमळनेर विकास सोसायटी मतदारसंघातून अर्ज दाखल केला होता. स्मिता वाघ यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भाईदास पाटील हे बिनविरोध निवडूण येतील अशी शक्यता वर्तविली जात आहे.
मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे व त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचेच अर्ज उरले आहेत. यामध्ये आता रोहिणी खडसे अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांची बिनविरोध निवड होणार हे आता जवळपास निश्चित मानले जात आहे. तसेच, रोहिणी खडसे महिला राखीव मतदारसंघातून लढण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जडभुसावळ विकास सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संतोष चौधरी यांचा अर्ज बाद झाला आहे. त्याठिकाणी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे रमण भोळेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, संतोष चौधरी यांना पक्षांतर्गत कुरघोडींचा फटका बसल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड झाल्याचे बोलले जात आहे. 6 जागांवर महाविकास आघाडीने कब्जा केलाजिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच 4 जागा आल्या आहेत, असे चित्र आहे. महाविकास आघाडीच्या बाजूने विचार केला तर 6 जागांवर महाविकास आघाडीने कब्जा केला आहे. धरणगाव विकास सोसायटी मतदारसंघानंतर अमळनेर विकास सोसायटी, बोदवड आणि मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघात उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्याने निश्चित झाले आहे. हा भाजपला जबर धक्का मानला जात आहे. जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप नेते गिरीश महाजन यांचे नेतृत्व सपशेल अपयशी ठरल्याची चर्चा सुरू आहे.