अमळनेर राजमुद्रा दर्पण । अमळनेर शहरात ढेकू रोडवरील लक्ष्मी नगरातील संदीप रुल्हे या विवाहित युवकाचा सर्पदंशाने बळी गेल्याने या रुल्हे तथा सुतार कुटुंबाचा आधारवडच हरपला आहे. शहरात उत्कृष्ठ फर्निचर कारागीर म्हणून नावारूपाला आलेला संदीप नारायण रुल्हे ज्याचे पितृछत्र तो दीड वर्षांचा असतानाच हरपले होते. दुर्देवाने त्याच्या मुलांचेही बालवयातच पितृछत्र हरपल्याने अनेकांनी प्रचंड दुःख व्यक्त केले.
रविवारीची काळी रात्र संदीप आपल्या लक्ष्मी नगरातील निवासस्थानी पत्नी,आई आणि चिमुकला मुलगा व मुलगी यांच्यासह झोपला होते. पहाटे चार वाचता अचानक त्याला अंगावरून काही जात असल्याचा भास झाल्याने संदीप दचकून उठला. पाहिले तर अंगावरून सर्प गेला होता, त्यानंतर तो सर्प मुलीच्या अंगावर गेला. मुलीच्या तोंडावर त्याचा स्पर्श झाल्याने तीही दचकून उठली तेवढ्यात संदीप ने तो सर्प तिच्या अंगावरून दूर फेकला. आवाजाने सारे कुटुंबच जागे होऊन आई सर्पाचा शोध घेऊ लागली. या घटनेस अर्धा एक तास होत नाही, तोच संदीपला मळमळ होऊन उलटी सह हातपायास मुंग्या येऊ लागल्याने फोनद्वारे खाजगी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार संदीप सकाळी डॉ. निखिल बहुगुणे यांच्या रुग्णालयात नेण्यात आले. तोपर्यंत त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होऊन कालांतराने त्याची प्राणज्योत मालवली. दुर्देवाने डॉ बहुगुणे यांनी त्यास मृत घोषित केले,त्यानंतर अमळनेर ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात संदीपवर अमळनेर येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.
मृत्यूच्या आधी संदीपने डॉक्टरांना स्वतः सांगितलेली लक्षणे पाहता सर्पदंशानेच संदीपचा बळी गेल्याचे स्पष्ट झाले, त्याआधी सर्प मित्रास बोलावून सर्प देखील दाखविला असल्याने तो मण्यार जातीचा अतिविषारी असल्याचे त्यांनी सांगितले, आणि या सर्पाने दंश केल्यानंतर देखील वरून काहीच खुण दिसत नसल्याने संदीपला आपणास सर्पदंश झाल्याचे कळालेच नाही अन्यथा लक्षणे येण्याआधीच उपचारासाठी तो रुग्णालयात पोहचू शकला असता, मात्र येथेही त्याचा घातच झाल्याने अनेकांनी दुःख व्यक्त केले.
संदीपचे मूळ गाव अकोला मात्र लहानपणी वडील गेल्यानंतर आईने त्याला अमळनेर येथे आपल्या माहेरी आणून भावांच्या मदतीने मुलास वाढवले, मधला काळ कठीण गेल्यानंतर संदीप फर्निचरचा कुशल कारागीर झाल्याने कुटंब आर्थिक अडचणीतुन सावरू लागले होते. संदीपच्या विवाहानंतर त्याच्या संसार वेलीवर दोन फुले उमलल्याने कुटुंब अधिकच बहरले होते, मात्र दुर्देवाने संदीपने अर्ध्यात नव्हे तर पहिल्या टप्प्यातच डाव सोडल्याने मोठा अनर्थ झाला असून कुटुंबाने आता कुणाच्या भरवश्यावर जगावे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
गोडाऊन कट्टा ग्रुप / ढेकूरोड परिसरच्या वतीने मदतीसाठी आवाहन करण्यात आला आहे. स्व.संदीप भाऊ रुल्हे यांचे निधन झाल्याने त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी,आई व लहान मुलगा व मुलगी आहे, त्यांचे पालनपोषण व मुलांच्या पुढील शिक्षणासाठी यथाशक्ती योग्य वाटेल एवढी आर्थिक मदत करावी अशी विनंती साऱ्यांनाच करण्यात आली असून यास प्रतिसाद देखील मिळत आहे, अजून कुणालाही मदत द्यायची असल्यास त्यांनी राजू मोरे, चंदू पाटिल, अवि जाधव, योगेश पाटिल, आकाश मनोरे यांच्याशी संपर्क साधावा.