धुळे राजमुद्रा दर्पण । धुळे शहरात रस्त्याचे काम कित्येक वर्षांपासून रखडत रस्त्याची दुरावस्था करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिवसेना स्टाईलने समजावण्यात आले. विशेष म्हणजे रस्त्यावर एमजीपी अधिकाऱ्याला नेवून चिखल तुडवायला भाग पाडले. जयहिंद महाविद्यालयाकडून वाडी भोकरगावाकडे जाणाऱ्या रस्त्याची एकबाजू खोदकामामुळे पुर्णपणे बंद झालेली आहे. एकाच बाजूने कशीबशी वाहतुक सुरु आहे. त्यातच खोदकामामुळे जमीनीतून जीर्ण जलवाहिन्या फुटल्या आहेत. पाणी पुरवठ्याच्यावेळी या रस्त्यांवर तलाव साचल्याचे दृष्य दिसते.
शहराच्या देवपुर भागातील वाडीभोकर रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. मात्र जलवाहिन्या फुटल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. जनतेने समस्या मांडल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी वाडीभोकर रस्त्यावर एमजीपी अधिकाऱ्याला नेवून चिखल तुडवायला भाग पाडले. चिखलातून वाट काढत अधिकाऱ्यांनी पाहणी करत दहा दिवसात रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिले आहे. धुळे शहराच्या देवपुर भागातील भुमिगत गटार आणि इतर कामांमुळे रस्त्यांची वाट लागली आहे.
वेळोवेळी विविध संघटनांतर्फे तसेच नागरिकांतर्फे संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देऊन देखील संबंधित प्रशासनातर्फे कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे ही कैफियत मांडली. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्याला खड्ड्यांवरील रस्त्यांवर आणून उभे केले. अखेर संबंधित अधिकाऱ्यांनी पुढील दहा दिवसात काम पूर्ण करण्याचे आश्वासन संबंधित शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे.