(राजमुद्रा वृत्तसेवा) शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर अतिरिक्त मालमत्ता बाळगल्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाच्या कारवाईनंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर ट्विटर वरून निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घोटाळेबाज प्रताप सरनाईकांना वाचवत आहेत का? असा सवाल करत सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले आहे.
“शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे घोटाळेबाज प्रताप सरनाईक ना वाचवितात? लपवितात? ठाणे भायंदरचे मतदार कोविडच्या काळात आमदार कुठे गायब झाले विचारत आहेत?,” असं ट्विट त्यांनी केलं आहे.
प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यात कुणेगाव परिसरातील बंगल्यावर बेहिशेभी मालमत्ता प्रकरणात सरनाईक आणि त्यांच्या मुलाची चौकशी करण्यात आली होती. ईडीकडून सरनाईक यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मंगळवारी सकाळी सरनाईक यांच्या लोणावळ्यातील फार्म हाऊसवर ईडीचे चौकशी पथक धडकल्यामुळे चर्चेला उधाण आले होतं.
कसलीही चाहूल न लागू देत करण्यात आलेल्या या तपासात बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेज आणि काही महत्वाचे कागदपत्र ताब्यात घेण्यात आले होते. लोणावळा ग्रामीण पोलिसांना या तपासाबाबत काहीच माहिती नसल्याने नेमकी कारवाई ईडीने केली आहे की सीबीआयने याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.