जळगाव राजमुदा दर्पण । जळगाव शहरासह जिल्ह्यात एकूण २२४ रेशन दुकाने सुरू होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून अनेक रेशन दुकानदारांनी शिधापत्रिकाधारकांना धान्याचा पुरवठा केला नव्हता, अनेकांनी वेळेत दुकाने सुरू ठेवली नव्हती, धान्य वितरणात अनियमितता आदी कारणांनी दीडशेच्या वर दुकाने रद्द झाली होती. यामुळे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने रेशन दुकाने नव्याने सुरू करण्याचे आदेश दिले होते.
शासन निर्णयानुसार पंचायत, नोंदणीकृत स्वयंसाहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था, महिला स्वयंसाहाय्यता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था या रास्तभाव/शिधावाटप दुकानासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
१० नोव्हेंबर पर्यंत, नवीन दुकानाकरिता प्राप्त झालेल्या अर्जाची प्राथमिक तपासणी छाननी होणार आहे. जागेची तपासणी व इतर आनुषंगिक कार्यवाहीची मुदत १० डिसेंबर २०२१ पर्यंत, नवीन दुकाने मंजूर करण्याची कार्यवाही २५ डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. रास्त भाव दुकानांसाठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येत आहे. इच्छुक संस्था/गट आदींनी आपल्या तालुक्याच्या तहसिल कार्यालयाशी संपर्क साधून प्रक्रियेविषयी अधिक माहिती प्राप्त करुन घ्यावी, असे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी सांगितले.