अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा समारोप
जळगाव राजमुद्रा दर्पण | देण्याचे महत्व हे कोरोनाने आपल्याला दाखवून दिले आहे. शिवसेनेचे तर ध्येयधोरणच ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण असे आहे. समाजातील दात्यांची संख्या खूप असून उलटपक्षी घेणार्यांची संख्या कमी असल्याची अनुभूती अनेकदा येत असते. डॉ. कमलाकर पाटील यांनी आयोजीत केलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरातून हीच बाब पुन्हा एकदा अधोरेखीत झाल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. या शिबिराच्या समारोपाच्या कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते.
सविस्तर वृत्त असे की, जळगाव तालुक्यातील फुफणी येथील माजी सरपंच डॉ. कमलाकर पाटील यांच्यातर्फे अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. विवेक पाटील आणि डॉ. वृषाली पाटील यांनी गरजू रूग्णांची अल्प दरात शस्त्रक्रिया केली. या शिबिराच्या समारोपाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ. कमलाकर पाटील, डॉ. विवेक पाटील, डॉ. वृषाली पाटील, माजी पं. स. उपसभापती शितल पाटील यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी ना.गुलाबराव गुलाबराव पाटील म्हणाले की, १९८४ साली मी शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून काम सुरू केले तेव्हा आम्ही अशाच प्रकारे विविध रोगांचे निदान करणार्या शिबिरांचे आयोजन करत होतो. तेव्हा मोतीबिंदू कमी प्रमाणात होत असल्याने शस्त्रक्रिया देखील मर्यादीत होत्या. आता मात्र याचे प्रमाण वाढत असल्याने डॉ. कमलाकर पाटील यांनी मोतीबिंदू शिबिराच्या माध्यमातून गरजूंची खर्या अर्थाने सेवा केल्याचे कौतुकोदगार ना. पाटील यांनी काढले. तर कोविड काळात समाजाच्या सर्व स्तरांमधील नागरिकांनी केलेल्या मदतीचे दाखले देत समाजात दातृत्वाची भावना अजूनही जीवंत असल्याचे ना. गुलाबराव पाटील यांनी आवर्जून नमूद केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कमलाकर पाटील यांनी केले. बहारदार सूत्रसंचालन उपशिक्षक संदीप पाटील सर यांनी केले तर आभार प्रफुल्ल पाटील यांनी मानले.