(राजमुद्रा वृत्तसेवा) पाचोरा येथील विवेकानंद नगर तांडा येथे पप्पु रतन पवार (वय ३१) हा त्याची पत्नी कस्तुरबाई (वय ३०) व त्यांच्या तीन मुलींसह राहत होता. आरोपी पप्पु पवार हा पाचोरा येथेच एक हॉटेलवर कामाला होता. दारू पिण्याचे व्यसन असलेल्या पप्पूने ०९/०६/२०१९ रोजी रात्री ‘कस्तुराबाईला मुलीच होता’ या कारणाने कस्तुरबाईशी भांडण करून तिला शिवीगाळ केली. रागाच्या भरात मद्यावस्थेत पप्पू पवारने लाकडी दांड्याने पत्नीचा डोक्यात मारले असता ती खाली कोसळली. त्यानंतर आरोपीच्या घराच्या शेजारी राहणारे त्याचे भाऊ व वहिनी कस्तुरबाईला पाचोरा येथील रुग्णालयात घेऊन गेले परंतु त्याठिकाणी तिला मयत घोषित करण्यात आले.
सदर घटनेची पप्पू विरोधात फिर्याद मयताची आई पद्मबाई सखाराम राठोड (वय ६०) रा.आनंद नगर तांडा, ता.एरंडोल हिने पाचोरा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. आरोपीला या गुन्ह्याचे कामी दि. १०/०६/२०१९ रोजी अटक करण्यात आलीहोती. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस उप निरीक्षक पंकज शिंदे यांनी केले.आरोपीच्या विरुद्ध प्रथम दर्शनी पुरावा दिसुन येत असल्यामुळे आरोपीच्या विरुद्ध दोषारोप दाखल करण्यात आले.
आरोपीच्या विरुद्ध सदरचा खटला सर्वप्रथम तत्कालीन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. जि.ए.सानप याच्या समोर चालले. त्यांच्या समक्ष या खटल्याचे कामी सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी आठ साक्षीदार तपासले, परंतु त्यांची बदली झाल्यामुळे व त्यानंतर कोरोनाच्या निर्बंदामुळे सदर खटला पुढे चालु शकला नव्हता. त्यानंतर डिसेंबर २०२० मध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.एस.डी. जगमालानी यांच्या समोर सरकार पक्षाने उर्वरित दोन साक्षीदार तपासून ह्या खटल्याचे कामी पुरावा ठेवण्याचे काम पूर्ण केले.
या खटल्याचे कामी जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी एकूण १० साक्षीदार तपासले. यात प्रामुख्याने आरोपीची मोठी मुलगी कु.गौरी हिची साक्ष महत्वपुर्ण ठरली कारण ही सर्व घटना तिच्या समोर घडलेली असल्यामुळे तिने सर्व घटनाक्रम जसाचा तसा न्यायालयासमोर संगीतला व घटना करणारा व्यक्ती कोण आहे असे विचारले असता तिने तिच्या वडिलांकडे म्हणजेच आरोपिकडे बोट दाखवले.या व्यतिरिक्त स्वतः फिर्यादी पद्मबाई राठोड,डॉ. निलेश देवराज पंच साक्षीदार व पो.उ.नि.पंकज शिंदे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.
आज (ता १९) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.एस.डी. जगमालानी यांनी कस्तुरबाई पवार हिचा खून केल्याच्या आरोपातून तिचा पती पप्पु रतन पवार याला दोषी ठरवून जन्मठेपेची व रुपये ५,०००/- दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी बाजू मांडली. दरम्यान गुन्हा घडल्यानंतर अटक झाल्यापासून आरोपी पती पप्पु पवार हा कारागृहातच होता. आज न्यायालयाने सदरची व्हिडिओ कॉन्फरन्सवर सुनावणी करून शिक्षा ठोठावली.