पुणे राजमुद्रा दर्पण । मुंबई, पुण्यासह महत्वाच्या महापालिका निवडणुका पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणार आहेत. अशावेळी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे. महापालिका निवडणुकीतही महाविकास आघाडी होणार का? असा प्रश्न विचारला जातोय. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठका होणार आहे. आज दुपारी 4 वाजता काँग्रेस भवनात ही बैठक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत युती करायची की नाही? या मुद्द्यावर चर्चा होणार आहे.
महापालिका निवडणुकीसाठी महापालिका निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांचं मत घेऊन मुंबईत मातोश्रीवर निरोप पोहोचवला जाणार आहे. पुण्यात महापालिकेत महाविकास आघाडी एकत्र येणार का? याच मुद्द्यावर आता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बैठक होत आहे. येत्या आठवड्याभरात पुण्यात आघाडीबाबत शिक्कामोर्तब होणार आहे. तर शिवसेनेचं मात्र 31 ऑक्टोबरला ठरण्याची शक्यता आहे.
शरद पवार यांच्या उपस्थितीत दिवाळीनंतर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक होणार आहे. त्याबाबत पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माहिती दिली आहे. या बैठकीत आजी माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे दिवाळीनंतरची राष्ट्रवादीची ही बैठक महत्वाची ठरण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. मात्र, पुण्यासारखी महत्वाची महापालिका काबिज करण्यासाठी राष्ट्रवादीकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून खुद्द शरद पवार मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. पवार यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत रणशिंग फुंकलं आहे. त्यावेळी त्यांनी ज्या पक्षाने शहराची उभारणी केली, त्या पक्षाला पुन्हा निवडून देण्याचं आवाहन पवारांनी केलंय. तर दुसरीकडे भाजपमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहे. भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी थेट विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या चुकांची यादीच दिलीय.
महापालिका निवडणुकीसाठी एकीकडी राष्ट्रवादी काँग्रेसनं जोर लावला आहे. तर दुसरीकडे भाजप नगरसेवकांमध्ये नाराजी आणि गटबाजी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडची सत्ता कायम राखण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील काय भूमिका घेतात? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.