मुंबई राजमुद्रा दर्पण । दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. शिवसेना विरुद्ध भाजप असं स्पष्ट चित्र इथे पाहायला मिळत आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रातील खंडणीखोर आणि वसुली सरकार तुम्हाला इथं हवं आहे का? असा सवाल फडणवीस यांनी केला फडणवीसांच्या या टीकेला आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय.
अशा प्रकारच्या निवडणुका भाजपनं लढवल्या नाहीत का? आम्हाला खंडणीखोर म्हणत असाल तर इथे भाजप प्रशासक खंडणीखोरीवर फडणवीस बोलत नाहीत? इथली जनता त्रस्त आहे. म्हणून मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली. फडणवीस खंडणीखोर सैतानाची तरफदारी करत आहेत, असा पलटवार संजय राऊत यांनी केला.
एक ज्येष्ठ खासदार आपलं जीवन संपवतो आणि केंद्रीय गृह मंत्रालयाला वाटलं नाही की या प्रकरणाची सखोल चौकशी करावी? महाराष्ट्र सरकार ती चौकशी करतेय पण केंद्र सरकारचीही जबाबदारी होती. भाजपचे अनेक लोक या प्रकरणाशी संबंधित कारण डेलकर यांच्या चिठ्ठीत अनेकांची नावे आहेत. इथल्या प्रशासकाचेही त्यात नाव आहे. आम्हाला पूर्ण खात्री आहे ही जागा जिंकतोय आणि विजयी सभेला उद्धव ठाकरे येतील, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केलाय.