चोपडा राजमुद्रा दर्पण । धानोरा ता. चोपडा येथे डेंग्यू सदृश्य आजाराने डोके वर काढले आहे. धानोऱ्यात स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने मलेरिया, टायफाइडसह डेंग्यू आजाराचे थैमान घातले आहे. तरीही गावात ग्रामपंचायत कडून स्वच्छता मोहीम अथवा मच्छर प्रतिबंधात्मक फवारणी केली जात नाही. खासगी रुग्णालये हाउसफुल असून डेंग्यूच्या रूग्णांवर जळगांव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गावात डेंग्यूची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असूनही ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राकडून आजपर्यंत काहीएक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आजपर्यंत गावात दहा ते बारा रूग्णांवर डेंग्यू सदृश्य आजार असल्याने जळगांव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
धानोऱ्यात डेंग्यूचे रुग्ण सापडत असूनही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांनी तपासणी साठी गावात येण्याची तसदी घेतली नाही. गावात हिवताप तपासणी मोहीम राबवून डासांचे नियत्रंण करण्यासाठी फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.गावात डेंग्यू सदृश आजाराचे रुग्ण असल्याचे समजले त्यामुळे गावात डेंग्यू अळी तपासणी मोहीम राबविण्यात आली व नागरीकांना कोरडा दिवस पाळण्याबाबत सूचना दिल्या.