मुंबई राजमुद्रा दर्पण । बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाची कामे गतीने पूर्ण करण्यात यावेत असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. बीडीडी चाळीच्या प्रस्तावित पुनर्विकास प्रकल्पाचा मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथी गृह येथे आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. शतकपूर्ती झालेल्या बीडीडी चाळी अत्यंत जर्जर अवस्थेत असल्याने शासनाने बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे नियोजन आखले आहे. बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेता या प्रकल्पाकडे नागरी पुनरुत्थानाचा आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून पाहिले जात आहे.