मुंबई राजमुद्रा दर्पण । समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र लिहित क्रांतीने न्याय देण्याची मागणी केली आहे. यानंतर क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्र्यांचे सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना फोन करून मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी वेळ मागितला आहे.
क्रांतीने पत्रात काय लिहिले?
‘माननीय उद्धव ठाकरे साहेब, लहानपणा पासून मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झालेली मी एक मराठी मुलगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेव ठाकरे यांचा आदर्श घेऊनच मी वाढले. कुणावर अन्याय करू नये आणि आपल्यावर होणारा अन्याय सहन तर मुळीच करू नये हे त्या दोघांनी शिकवले. तोच धडा गिरवत आज मी एकटीने माझ्या खाजगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरोधात ठामपणे उभी आहे आणि लढतेय. सोशल मीडिया, त्यावरचे लोक फक्त मजा बघत आहेत.
‘मी एक कलाकार आहे. राजकारण मला कळत नाही आणि मला त्यात पडायचं सुद्धा नाही. आमचा काहीही संबंध नसताना रोज सकाळी आमच्या अब्रूची लख्तरं चार चौघात उधळली जातात. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्यागरिमेचा खेळ करून ठेवला आहे. विनोद करून ठेवला आहे. आज बाळासाहेब असते तर त्यांना हे नक्कीच पटले नसते. एका महिलेवर आणि तिच्या परिवारावर होणारे खाजगी हल्ले हे राजारणाचे किती नीच स्वरूप आहे हे नेहमीच त्यांच्या विचारातून आमच्या पर्यंत पोहोचलेले आहे. आज ते नाही पण तुम्ही आहात. त्यांची सावली त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो. तुम्ही आमचे नेतृत्व करत आहात आणि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही कधीच माझ्यावर व माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही याची मला खात्री आहे. म्हणून एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय. तुम्हीं योग्य तो न्याय करा अशी विनंती.