मुंबई राजमुद्रा दर्पण । आर्यनच्या जामीनावर सुनावणीला सुरुवात युक्तिवाद तासाभरात पूर्ण झाल्यास उच्च न्यायालय आजच देऊ शकते निकाल क्रूझ ड्रग्ज प्रकरणी मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात असलेल्या आर्यन खानच्या जामीनावर आज निर्णय येऊ शकतो. मुंबई उच्च न्यायालयात थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होईल. आरोपींच्या जामीनाला विरोध दर्शवत सरकारी वकील अनिल सिंग एनसीबीच्या वतीने आज युक्तिवाद करतील.
एसीजी अनिल सिंग, वकील श्रीराम शिरसत आणि एनसीबीची टीम कोर्टात दाखल झाली आहे. बुधवारी न्यायालयाने म्हटले होते की, जर सरकारी वकिलांनी तासाभरात युक्तिवाद पूर्ण केल्यास गुरुवारीच या प्रकरणावर निर्णय देता येईल. आज सुनावणीचा हा तिसरा दिवस आहे. आर्यन खानची बाजू मांडणारे वकील मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला की, अटक वॉरंटमध्ये वास्तविक आणि योग्य कारणांचा उल्लेख नसल्यामुळे अटक घटनात्मक तरतुदींचे थेट उल्लंघन आहे.
त्यानंतर आज तपास यंत्रणा आणि सरकारी पक्ष या नात्याने एनसीबी आपली बाजू न्यायालयात मांडणार आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत नेमके काय होते. हे पाहणे अति महत्वाचे ठरणार आहे. २ऑक्टोबरला एनसीबीने मुंबईत कॉर्टेलिया क्रूझवर छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईदरम्यान, एनसीबीनं एकूण
८ लोकांना अटक केली. अटकेची कारवाई झाल्यापासून हे सर्वजण तुरुंगातच असून त्यांच्या जामीन याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मुंबईतील विशेष न्यायालयामध्ये यासंदर्भात सुनावणी सुरू असताना २६ऑक्टोबर रोजी दोन आरोपींना मनिष राजगरिया आणि आविन साहू जामीन मंजूर करण्यात आला. या प्रकरणामध्ये पहिल्यांदाच आरोपींना जामीन मिळाला.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचे जामीन अर्ज विशेष एनडीपीएस न्यायालयाने फेटाळून लावले होते. त्यानंतर या तिघांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली. त्यांच्या अर्जांवर आज पुन्हा सुनावणी होणार आहे.