धुळे राजमुद्रा दर्पण । धुळे शहरामध्ये चाळीसगाव रोड परिसरामध्ये पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्युनिसिपल कार्पोरेशन शाळा क्रमांक ५१,५२ च्या शेजारी एका पत्र्याच्या शेडमध्ये काही ईसम हे घरगुती गॅस वाहनामध्ये अवैधपणे भरत असल्याची माहिती गुप्त माहिती चाळीसगाव रोड पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला असता त्यावेळी पोलिसांना एका ऑटो रिक्षामध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या टाकीतून गॅस भरण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्याच ठिकाणी एक ऍपेरिक्षा देखील पोलिसांना आढळून आली आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत गॅस वाहनांमध्ये भरणाऱ्या दोघा तरुणांना पोलिसांनी रंगेहात पकडले.
ॲपेरिक्षा व ऑटो रिक्षासह तब्बल तीस घरगुती गॅसच्या टाक्या ज्यामध्ये २७ गॅसच्या टाक्या भरलेल्या व तीन टाक्या या अर्धवट भरलेल्या पोलिसांना आढळून आल्या. या कारवाईमध्ये जवळपास चार लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून या कारवाईदरम्यान दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच इतक्या मोठ्या संख्येने घरगुती गॅसच्या टाक्या या दोघां ईसमांकडे कुठून आल्यात याचा देखील तपास चाळीसगाव रोड पोलीस करीत आहेत.