(भडगाव राजमुद्रा वृत्तसेवा) शेतकी संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ज्वारी, मका, गहू खरेदी करण्यासाठी भडगाव येथील शेतकऱ्यांनी ज्वारीसाठी १०६२, मकासाठी ५६० तर गव्हासाठी १२ शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली आहे. प्रत्यक्षात खरेदीसाठी आजपावेतो खरेदी केंद्र सुरूवात झाली नसल्याने राष्ट्रवादी युवती काँग्रेस उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांनी लावकर्ता लवकर ती सुरू करण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांचा खरीप हंगाम जवळ आला आहे. त्यांच्या पूर्व तयारीसाठी त्यांच्या रब्बी हंगामाचा शेतमाल विक्री झाल्यानंतरच येणाऱ्या पैशातून त्यांचे सर्व नियोजन अवलंबून असल्याने अद्याप खरेदी सुरू नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. खरीप पीकांची पेरणी पंधरा दिवसाच्या अवधीवर येऊन ठेपली आहे. खरीप पीकाची पूर्व तयारी म्हणून शेतशिवारातील मशागतीची कामे पूर्ण झाली असून खरेदी केंद्र सुरू कधी होईल याकडे संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकरी हतबल व हवालदिल झाले असून भडगाव तालुक्यातील जवळपास १५० शेतकऱ्यांनी खरेदीसाठी ऑफलाईन अर्ज शेतकीसंघाकडे जमा केले असून ऑफलाईन प्रक्रिया पुन्हा काही दिवसांसाठी सुरू करून शेतकरी बांधवांची नाव नोंदणी करून घेता येईल. त्यामुळे तात्काळ खरेदी केंद्र सुरू करण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेस उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांनी केली.