जळगाव राजमुद्रा दर्पण । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणारे नाना पाटील यांचे अपील फेटाळून लावण्यात आले आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याचा निर्णय नाशिक विभागीय सहनिबंधक यांनी दिल्याने खडसे यांचा जिल्हा बँक संचालक पदाचा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा बँक संचालक पदाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघातून अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या विरोधात नाना पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांनी भुसावळ येथील एका पतपेढी चे कर्ज घेवून ते थकवले असल्याचा आक्षेप त्यांच्यावर घेण्यात आला. यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज बाद केला.
या निर्णयाविरोधात पाटील यांनी नाशिक विभागीय सहनिबंधक यांच्या कडे अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनीही त्यांचे अपील फेटाळले. त्यामुळे पाटील यांचा अर्ज बाद झाला आहे. परिणामी, एकनाथ खडसे यांचा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच अर्ज बाद झालेल्या भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हा परिषद सदस्य माधुरी अत्तरदे, भारती चौधरी यांच्यासह आठ उमेदवारांचे अपील फेटाळण्यात आले आहे.
अनुसूचित जाती जमाती मतदार संघातील महेंद्र सपकाळे यांचे अपील मंजूर करून त्यांचा अर्ज कायम ठेवण्यात आला आहे. मात्र अर्ज बाद केलेले उमेदवार औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. दरम्यान, खडसे यांच्या सून व भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचा उमेदवारी अर्जही बाद झाला आहे. त्यांनी महिला राखीव व इतर मागासवर्ग या दोन गटात अर्ज दाखल केला होता. पण दोन्ही अर्ज छाननीत बाद झाले आहेत.